मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मागत आहेत पॅरोल, उच्च न्यायालयात याचिका

नागपूर : मुंबई येथे 1998 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी असगर कादर शेख आणि मोहम्मद याकूब नागूल यांनी पॅरोल रजा मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकार, गृह मंत्रालय, कारागृह महानिरीक्षक आणि विभागीय आयुक्तांना नोटीस बजावली आहे. 23 जानेवारी ते 27 फेब्रवारी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील या गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दोघेही नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
याचिकेनुसार, मुंबईतील लोकलमध्ये कांजूरमार्ग, विरार, गोरेगाव, मालाड, सांताक्रूझ आणि कांदिवली रेल्वेस्थानकाजवळ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात त्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी जावेद मुलाम हसन, अफदाब सईद, असगर कादर शेख, कादीर मोहम्मद शेख, खालिद अन्सारी, शाब्र बशीर जव्हाण, जाफर शेख, मो. याकूब नगूल, मो. चौहान, अशफाक शेख, फारूख युसूफ शेख आणि अफताब शेख यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, असगर शेख आणि मोहम्मद नगूल यांनी पॅरोल मिळावा यासाठी सुरुवातीला कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता.
क्लिक करा – ऑनलाईन खरेदी करताय, फसवणुकीपासून राहा अलर्ट
मात्र, त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. त्यांच्यासोबतच्या इतर आरोपींचा पॅरोल मंजूर करण्यात आला. इतकेच नव्हेतर याच घटनेतील इतर सह आरोपींना औरंगाबाद कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आले, असेही न्यायालयाला याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडताना ऍड. मीर नगमान अली यांनी सांगितले. आरोपी हे बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याच्या एकमेव कारणामुळे त्यांना पॅरोल मंजूर केलेला नाही, असे दिसून येते. इतर आरोपींना पॅरोल देण्यात आला आहे. तेव्हा नोटीसवर उत्तर सादर करीत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी आणि योग्य निर्णय घेऊन आदेश द्यावा, असे उच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.