मुख्यमंत्र्यांच्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’मध्ये बनावटगिरी ! तापमान अन्‌ ऑक्‍सिजन लेव्हलची सर्व्हेविनाच नोंद 

सोलापूर : कोरोनाचे संकट हद्दपार करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘कुटूंब माझी जबाबदारी’ ही नवी मोहीम सुरु केली. त्यानुसार घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबांचा सर्व्हे करुन त्या कुटुंबातील व्यक्‍तींचे वय, को-मॉर्बिड रुग्णांची नोंद, त्यांचे तापमान, त्यांचे पूर्वीचे आजार, ऑक्‍सिजन लेव्हल नोंदविणे अनिर्वाय आहे. मात्र, सोलापूर महापालिकेतील साबळे नागरी आरोग्य केंद्राने त्यात बनावटगिरी केली आहे. या मोहिमेअंतर्गत कुटुंबातील सदस्यांची नावे नोंदविली, मात्र तापमान व ऑक्‍सिजन लेव्हल, पूर्वीचे आजार अंदाजे नोंदविण्यात आले आहेत. 

राज्यातच नव्हे तर देशातील टॉपटेन शहरात सोलापूर मृत्यूदरात अव्वल होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांनी सोलापूरचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासनाला वारंवार सूचना केल्या. त्यानंतर रॅपिड ऍन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून रुग्णांची शोध मोहीम हाती घेण्यात आली. आता शहरातील कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची टक्‍केवारी कमी झाली असून दररोज एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍के रुग्ण आढळत आहेत. आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, को-मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरु नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी नवी मोहीम सुरु केली. त्यानंतर शिक्षक, महापालिका कर्मचारी, आशासेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरात घरोघरी सर्व्हे सुरु झाला. मात्र, या सर्व्हेत बनावटगिरी होत असल्याचे समोर आल्याने चिंता व्यक्‍त केली जात आहे. 

प्रकार गंभीर; चौकशीनंतर निश्‍चित होईल कारवाई 
‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कुटुंबातील सदस्यांची नावे, त्यांच्या कुटुंबातील को-मॉर्बिड व्यक्‍तींचे पूर्वीचे आजार नोंदविणे आवश्‍यक आहे. त्यानंतर पुन्हा घरोघरी जाऊन त्या कुटुंबातील व्यक्‍तींचे तापमान, ऑक्‍सिजन लेव्हल तपासण्याचे आदेश दिले आहेत. सर्व्हे न करता ऑक्‍सिजन लेव्हल तथा तापमान नोंदविल्याबद्दल साबळे नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून असा प्रकार झाल्याची तक्रार आहे. त्यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल. 
– पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर 

ऑनलाइनचे काम संपवा, अन्यथा गैरहजेरी 
‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व्हे पूर्ण झाल्याचा अहवाल नागरी आरोग्य केंद्रांनी आयुक्‍तांना दिला. मात्र, आयुक्‍तांनी दिलेल्या सर्व्हेच्या अर्जावर ना वैद्यकीय अधिकाऱ्यांची ना संबंधित सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे. त्या अर्जावर सर्दी, ताप, खोकला, श्‍वास घेण्यास त्रास, रक्‍तदाब, मधूमेह, दमा, कॅन्सरचे रुग्ण तथा ज्येष्ठ नागरिक आहेत का, याची नोंद करणे अपेक्षित आहे. मात्र, बहूतांश अर्जांवर केवळ कुटूंबातील व्यक्‍तींची नावे व त्यांचे वय नोंदविण्यात आले आहेत. उर्वरित माहिती काहीच भरली नसल्याने आता ते रिकामे रकाने अंदाजित भरले जात आहेत. ते काम तत्काळ पूर्ण करा, अन्यथा गैरहजेरी लावली जाईल. को-मॉर्बिडचा सर्व्हे करु नका, परंतु मोबाईलवरुन ऑनलाइन अर्ज भरा, असा सल्ला साबळे नागरी आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती शिक्षकांनी ‘सकाळ’ला दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.