मुद्रांक शुल्क कपातीमुळे राज्याची तिजोरी झाली “वजनदार”

संगमनेर ः मुद्रांक शुल्क कपातीच्या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी आली आहे. राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर आली आहे. चार महिन्यांत दस्तनोंदणीत तब्बल 48 टक्के, तर महसूलात 367 कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, की कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्र व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – ग्रामपंचायत निवडणुकीत रोडरोलरला मागणी

या निर्णयाचा चांगला फायदा झाल्याने बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणारांनाही मोठा फायदा झाला आहे. मुद्रांक शुल्कात सरसकट तीन टक्के सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला.

महसूल विभागाने राबविलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के, तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली. यामुळे राज्याची अर्थव्यवस्था व उद्योगक्षेत्राने गती पकडली आहे. 

डिसेंबर 2019 मध्ये 2 लाख 39 हजार 292 दस्तनोंदणीसह 2 हजार 712 कोटींचा असलेला महसूल डिसेंबर 2020 मध्ये तब्बल 4 लाख 59 हजार 607 दस्त नोंदणी होऊन, 4 हजार 314 कोटींचा महसूल प्राप्त झाल्याने, दस्त नोंदणीत तब्बल 92 टक्के तर महसूलात 59 टक्के वाढ झाली आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 2019 साली 8 लाख 44 हजार 636 दस्त नोंदणी होऊन महसूल 9 हजार 254 कोटी रुपये मिळाला होता. 2020 मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 12 लाख 56 हजार 224 दस्त नोंदणी झाली आणि 9 हजार 622 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत 48 टक्के, तर महसुलात 3.97 टक्के वाढ झाली. महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला दिलेल्या बुस्टर डोसमुळे या क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे. 

कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही खिळ बसली होती. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येण्यास मदत झाली, तसेच ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. 

संपादन – अशोक निंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published.