मॉन्सूनने घेतला निरोप; ईशान्य मोसमी वारे झाले सक्रिय 

पुणे – परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी पोषक स्थिती झाल्याने नैऋत्य मॉन्सूनने संपूर्ण देशातून बुधवारी (ता. २८) माघार घेतली. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मॉन्सूनचे वारे परतले असून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा मॉन्सून साधारणपणे एक जून रोजी केरळात दाखल झाला होता. त्यानंतर ११ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होत १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. त्यानंतर वेगाने उत्तरेकडे सरकून संभाव्य वेळेच्या बारा दिवस अगोदर २६ जून रोजी मॉन्सून वाऱ्यांनी संपूर्ण देशव्यापला. या कालावधीत राज्यासह देशात अनेक ठिकाणी कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दिलासा मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साधारणपणे राजस्थानमध्ये तीन महिने दोन दिवस मुक्काम केल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मॉन्सून परतीवर निघाला. हवामान विभागाने १७ सप्टेंबर ही परतीच्या मॉन्सूनची तारीख जाहीर केली होती. मात्र, तब्बल अकरा दिवस उशिराने मॉन्सूनने पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला होता.  त्यानंतर सहा ऑक्टोबरपर्यंत बहुतांशी वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले होते. परंतु ९ ऑक्टोबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीचा प्रवास जवळपास पंधरा दिवस रेंगाळला होता. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी पूर्व भारतातून मॉन्सूनने माघार घेतली होती. तर २६ ऑक्टोबर रोजी निम्म्या महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागातून परतीचा मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी जाहीर केले होते.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चालू वर्षी सुधारित वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सूनने देशातून निरोप घेणे अपेक्षित होते. मात्र, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीचा प्रवास चांगलाच लांबला होता. देशात एक जूनला दाखल झालेल्या मॉन्सूनने देशभरात तब्बल चार महिने २७ दिवस मुक्काम केला असून बुधवारी(ता.२८) मॉन्सूनने देशातून निरोप घेतल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By- Kalyan Bhalerao)

Leave a Reply

Your email address will not be published.