मोठी बातमी ! शाळांना 31 ऑगस्टपर्यंत टाळेच; गावकऱ्यांच्या ठरावानंतरच सुरू होणार शाळा

सोलापूर : ऑगस्ट महिन्यात ज्या गावांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही, अशा गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीने पालकांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षण विभागाला ठराव द्यायचा आहे. त्या ठरावानुसार सप्टेंबरपासून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र, लॉकडाउन 31 ऑगस्टपर्यंत वाढविल्याने तूर्तास राज्यातील संपूर्ण शाळा, महाविद्यालयांना टाळेच राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
हेही वाचा : बापरे..! संजय काळे खुनाच्या कटात मुलासह पत्नीचाही सहभाग; केली पोलिस कोठडीत रवानगी
राज्यातील सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमधील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या सर्वाधिक राहिली आहे. त्यामुळे असे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमधील शाळा सुरू करताना आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला जाणार आहे. तसेच मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करण्याबाबत पालकांचे संमतीपत्र लागणार आहे. सद्य:स्थितीत “शाळा बंद अन् शिक्षण सुरू’ यानुसार ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात असून, त्यासाठी दूरचित्रवाणी, आकाशवाणीचीही मदत घेतली जात आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणापासून चार हात लांब असलेल्या विशेषत: डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा काहीच लाभ होत नसल्याचेही चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
हेही वाचा : अबब… एवढा व्याजदर! वीस हजारांसाठी घेतले 12 लाखांचे व्याज अन् पुन्हा…
ऑगस्टपर्यंत बंदच राहतील शाळा
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंद राहतील. त्यानंतर जिल्हानिहाय परिस्थिती पाहून निर्णय अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी संबंधित गावातील शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव गरजेचा आहे. तत्पूर्वी, शाळा कधीपासून सुरू होतील, हे आताच सांगणे कठीण आहे.
ठळक बाबी…
- किमान एक महिन्यापर्यंत कोरोनाचा रुग्ण सापडला नसलेल्या गावातील शाळा सुरू करण्याचे नियोजन
- शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी गावातील शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविला निर्णय
- पालकांचे प्रतिनिधी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीला शाळा सुरू करण्याबाबतचा द्यावा लागणार ठराव
- शाळा, वर्गखोल्या सॅनिटायझिंग अन् विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक
- 31 ऑगस्टनंतर शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाला ठराव सादर करण्याच्या सूचना
संपादन : श्रीनिवास दुध्याल