यंदाची आषाढी यात्रा ‘या’ पद्धतीने होण्याची शक्यता, ‘एबीपी माझा’ला सूत्रांची माहिती

संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यांनी यंदा पायी पालखी सोहळे न काढण्याचा निर्णय घेतला आहे. संत नामदेवांची पालखी पंढरपूर येथेच असल्याने प्रश्न फक्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबाबत उरला आहे.

पंढरपूर : आषाढी यात्रेबाबत सध्या राज्यभर उलटसुलट अंदाज वर्तवले जात असताना यंदा कोरोनाच्या संकटामुळे मानाच्या 7 पालखी सोहळ्यांना थेट वाहनातून पादुका पंढरपूरकडे आणाव्या लागणार आहेत. यापूर्वीच संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यांनी यंदा पायी पालखी सोहळे न काढण्याचा निर्णय घेतला आहे. संत नामदेवांची पालखी पंढरपूर येथेच असल्याने प्रश्न फक्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबाबत उरला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांसोबत यापूर्वीच चर्चा केली आहे. आता येत्या 29 मे रोजी अजित पवार सोलापूर आणि साताऱ्याच्या पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय देणार आहेत. मात्र एबीपी माझाकडे मिळालेल्या माहितीनुसार,

1- सर्व सात मानाच्या पालख्यांना वाहनातूनच पंढरपूरकडे दशमी दिवशी सकाळी निघावे लागणार आहे. यात मोजक्या लोकांसह प्रस्थान करून पालखीला त्याच ठिकाणी ठेवावी. येथे संपूर्ण पालखी मार्गावर होणारे विधी व नित्योपचार त्याच ठिकाणी करावेत.

2 – दशमी दिवशी म्हणजे 30 जून रोजी या पालखीतील पादुका एका वाहनातून पंढरपूरकडे आणाव्यात. यावेळी त्यांच्यासोबत केवळ 4 ते 5 जणांना परवानगी दिली जाईल.

3 – आषाढी एकादशीला म्हणजे 1 जुलै रोजी या मानकऱ्यांनी पादुकांना चंद्रभागा स्नान घालून नागरप्रदक्षिणे ऐवजी विठ्ठल मंदिराची प्रदक्षिणा करावी. द्वादशीला म्हणजे 2 जुलै रोजी या पादुका मानकऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत मंदिरात आणून देवाचा नैवेद्य दाखवावा आणि याच दिवशी पौर्णिमेला होणारी देव व संत भेटीचा कार्यक्रम उरकून पुन्हा आपल्या गावाकडे वाहनातून परतावे.

4 – आषाढीसाठी राज्यातील कोणत्याही वारकऱ्यांनी पंढरपूरकडे येऊ नये यासाठी 25 जून ते 5 जुलै याकाळात शहरात संपूर्ण नाकाबंदी करण्याचा विचार असून केवळ आपत्कालीन यंत्रणा आणि शासनाने मंजुरी दिलेल्या मानाच्या पालख्या यांनाच प्रवेश दिला जाईल. एकादशी दिवशी शहरात असलेल्या नागरिक आणि भाविकांनीही मंदिर व चंद्रभागा परिसरात येऊ नये यासाठी याभागात 144 कलम जाहीर करावे. यामुळे कोणतीही गर्दी न होता सोहळा संपन्न होईल आणि कोरोनाचा धोकाही राहणार नाही.

5 – आषाढी एकादशीची शासकीय महापूजा प्रथेप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक करतील. यावेळीही मंदिरात समितीचे अध्यक्ष , कार्यकारी अधिकारी आणि 10 पुजारी याशिवाय मुख्यमंत्री दाम्पत्य आणि त्यांच्यासोबत 5 जणांनाच परवानगी दिली जाणार आहे. ज्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजशिष्ठाचाराची गर्दी होणार नाही.

सध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातही कोरोनाची साथ पसरू लागली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत जात असल्याने संपूर्ण प्रशासन कोरोनाच्या लढ्यात व्यस्त आहे. अशावेळी परंपरा जपताना समाजाच्या आरोग्याला बाधा होण्याचे कारण वारकरी कधीही होणार नाहीत. यातूनच कोरोनाचा धोका कमीतकमी करण्यासाठी या मॉडेलवर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.