“या’ शहर-जिल्ह्यात दडल्यात अण्णाभाऊंच्या आठवणी; अमर शेख यांच्याशी होते जिव्हाळ्याचे संबंध

सोलापूर : सोलापूर शहरातील पार्क मैदानावर झालेला लाल बावटा पथकाचा कार्यक्रम, बार्शी तालुक्यातील वैराग येथील संतनाथ महाराजांची यात्रा आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील 1958 च्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अनेक आठवणी सोलापूर शहर व जिल्ह्यात दडल्या आहेत. बार्शीतील शाहीर (कै.) अमर शेख आणि अण्णा भाऊ साठे यांच्या मैत्रीमुळे सोलापुरातील अनेक कलावंत, कामगार नेते, साहित्यिक यांना अण्णा भाऊ साठे यांचा सहवास लाभला.
हेही वाचा : अरे देवा..! इथे मृत्यूनंतरही आत्म्यांना वाट पाहावी लागतेय मोक्षप्राप्तीसाठी; नातेवाईकही हळहळताहेत
कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापुरातील पार्क चौकात 1948 मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा गिरणी कामगारांसाठी लाल बावटा पथकाचा जाहीर कार्यक्रम झाला. शाहीर भाई फाटे यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमाच्या अनेक आठवणी आजही जुन्या पिढीत दडल्या आहेत. मोहोळ-वैराग विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व शेतकरी कामगार पक्षाचे नेते (कै.) चंद्रकांत निंबाळकर यांच्यामुळे अण्णा भाऊ साठे हे वैरागमधील संतनाथ महाराजांच्या यात्रेला आल्याची माहिती डॉ. अजिज नदाफ यांनी दिली. “अकलेची गोष्ट’, “शेठजीचे इलेक्शन’ आणि “देशभक्त घोटाळे’ या नाटकांच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यात कला सादर केल्याचीही आठवण डॉ. नदाफ यांनी सांगितली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 1958 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ऍड. पटवर्धन यांच्या प्रचारासाठी अण्णाभाऊ साठे यांनी पंढरपुरात काही दिवस मुक्काम केल्याचेही डॉ. नदाफ यांनी सांगितले.
हेही वाचा : राष्ट्रवादीसोबत हुकतेय शिवसेनेच्या सत्तेचे टायमिंग, सोलापूरच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची व्यथा
विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांचेही अध्यासन केंद्र सुरू करावे
अण्णा भाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांची मैत्री जवळपास 20 वर्षांहून अधिक काळाची आहे. अमर शेख आणि अण्णा भाऊ साठे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अमर शेख यांच्या जन्म शताब्दीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शेख यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू झाले. जन्मशताब्दी झाली, अध्यासन केंद्र सुरू झाले परंतु त्यातून ठोस असे काही हाती लागले नाही. विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांचेही अध्यासन केंद्र सुरू करावे. अमर शेख आणि अण्णा भाऊ साठे यांच्या अध्यासनाला शासनाने ठोस मदत करून या दोघांची मैत्री जपण्यासाठी व नव्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी अभ्यासक डॉ. अजिज नदाफ यांनी केली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल