युजीसीच्या सुधारित गाईडलाइन्सनुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार

मुंबई : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एकीकडे विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर युजीसी काय नेमका निर्णय देते याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याप्रमाणे बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घेणे अनिवार्य असल्याचे सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही राज्यांच्या उच्च शिक्षण सचिवांना पत्र लिहून परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनंतर राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवाय अंतिम वर्ष सोडून इतर परीक्षांबाबत युजीसीने आधी ज्या गाईडलाइन्स दिल्या आहेत, त्यानुसार परीक्षा न घेता इंटर्नल मार्क्सनुसार विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत.

यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या परीक्षा या सप्टेंबरमध्ये घ्यायच्या आहेत. या परीक्षा ऑफलाईन (पेपर/ पेन पद्धतीने ), ऑनलाईन पद्धतीने किंवा संमिश्र पद्धतीने घेतल्या जाऊ शकणार आहेत. काही कारणास्तव सप्टेंबरमधील परीक्षांना विद्यार्थ्यांना उपस्थित राहता आले नाही तर विद्यापीठ किंवा उच्च शैक्षणिक संस्थेकडून योग्य वेळेनुसार पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्याला परीक्षेची संधी देण्यात यावी. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. मात्र ही संधी केवळ 2019- 20 मधील सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी एकदाच उपलब्ध असणार आहे. इतर वर्षाच्या परीक्षांसाठी यूजीसीच्या जुन्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणेच कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आपले आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन हे त्याच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. जागतिक पातळीवर आपली पात्रता , शैक्षणिक सक्षमता सिद्ध करण्यासाठी, करिअरमधील संधीसाठी तसेच भविष्यातील प्रगतीसाठी परीक्षांमधील गुणवत्ता सिद्ध करणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यवश्यक आहे. परीक्षांमधील यश हे विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात समाधान आणि विश्वास निर्माण करतेच शिवाय जागतिक पातळीवरील त्यांची सक्षमता ही सिद्ध करण्यास मदत करते. या कारणास्तव यूजीसीने या परीक्षा घेण्याचा निर्णय सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये घेतल्याचे म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

UNIVERSITY EXAMS | विद्यापीठ परीक्षांसाठी UGCच्या गाईडलाईन्सनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी

Leave a Reply

Your email address will not be published.