रत्नागिरीवासियांची जबाबदारी वाढली; अटी आणि शर्तींसह जनजीवन हळूहळू रुळावर

रत्नागिरीतील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. रत्नागिरी नॉन रेड झोनमध्ये येत असल्यामुळे काही अटी आणि शर्तींसह दुकाने आणि जनजीवन सुरु झाले आहे.

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवनही ठप्प झाले होते. पण, आता जिल्हा नॉन रेड झोनमध्ये येत असल्यामुळे त्या ठिकाणी काही अटी आणि शर्तींसह दुकाने आणि जनजीवन सुरु झाले आहे. या नव्या नियमावलीनुसार सर्व दुकाने, एसटी, रिक्षा, सलून, स्पा देखील सुरु झाली आहेत. पण, कोरोनाच्या काळात नागरिकांना सर्व काळजी घ्यावी लागणार आहे. आजपासून शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केले. त्यानंतर आता रत्नागिरीतील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. रस्त्यांवरची वर्दळही वाढली आहे. रिक्षा, एसटी बस यांच्यासह खासगी वाहनांची वर्दळ आता रस्त्यांवर दिसून येऊ लागली आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवता येणार आहेत.

काय आहेत अटी आणि काय राहणार सुरु
नवीन नियमावलीनुसार आता जिल्हांतर्गत बससेवा, रिक्षा आणि केशकर्तनालये (सलून) यांना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. क्रीडा संकुले, मैदाने आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागी सामाजिक अंतर ठेवून वैयक्तिक सरावाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र समूह किंवा गटाने प्रेक्षक जमा होतील असे क्रीडा प्रकार आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत सुरु ठेवता येणार आहेत. पण, दुकानांच्या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. शिवाय, दुकानासमोर एकाच वेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत याची काळजी देखील दुकान मालकाला घ्यावी लागणार आहे.

रिक्षामध्ये 1 वाहनचालक आणि 2 प्रवाशी यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तर केवळ 50 टक्के अर्थात 22 प्रवाशी घेत एसटी धावणार आहे. जिल्ह्यातील 9 एसटी डेपोंमधून या एसटी धावणार आहेत. पोस्ट आणि कुरिअर सेवा सुरु राहणार आहे. अंत्यविधी यात्रेच्या वेळी 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असली तरी त्यांना अंतर राखावे लागणार आहे. शिवाय, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये 100 टक्के उपस्थिती ठेवत सुरळीत सुरु ठेवता येणार आहेत.

नागिरकांची जबाबदारी वाढली
काही अटी आणि शर्थींसह जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. ते हळूहळू पूर्वपदावर देखील येईल. पण, त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. या साऱ्या गोष्टी करत असताना जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.