राज्याच्या शिक्षण विभागातील “यु-डायस प्लस’मध्ये गोलमाल; केंद्राने फटकारले

सोलापूर ः राज्यातील शिक्षण विभागाने पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षक व शाळांचा सर्व डाटा एकत्रित राहावा यासाठी “यु-डायसप्लस’ ही संगणकीकृत प्रणाली सुरु केली आहे. मागील तीन वर्षाचा डाटा या प्रणालीमध्ये अपलोड केला आहे. तो डाटा केंद्राला पाठविल्यानंतर त्यामध्ये गोलमाल असल्याचे केंद्राच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे केंद्राने राज्याला त्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
राज्याने पाठविलेल्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे मत केंद्राने नोंदविले आहे. शिक्षण विभागाने तीन वर्षाचा यु-डायस प्लस डाटा अपलोड केला आहे. त्यामध्ये 30 जिल्ह्यातील विद्यार्थी, 11 जिल्ह्यातील शाळा तर सात जिल्ह्यातील शिक्षकांच्या संख्येमध्ये तफावत असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. राज्याने 2019-20 या शैक्षणिक वर्षाची माहिती “यु-डायस प्लस’ या प्रणालीमध्ये अपलोड केली आहे. या अपलोड केलेल्या माहितीचे केंद्राने विश्लेषण केले आहे. त्यामध्ये मागील यु-डायसमधील माहिती व चालूच्या युडायसमधील माहितीत तफावत आहे. चालूची माहिती कमी नोंदविली असल्याचे केंद्राने म्हटले आहे. 2019-20 या यु-डायस प्लसमध्ये कमी नोंदणी करण्यामागची कारणे काय आहेत याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याची नेमकी कारणे काय आहेत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही केंद्राच्या शिक्षण विभागाचे उपसंचालक विकास निगम यांनी राज्याला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत होऊ नये, सर्व माहिती ऑनलाइन केल्यानंतर एकाच क्लिकवर उपलब्ध व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन यु-डाय प्लस प्रणाली सुरु केली. मात्र, त्या प्रणालीमध्येही तफावत आढळून आल्याने या प्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत शिक्षण आयुक्त, माध्यमिकचे शिक्षण संचालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आकडे बोलतात…
पहिली ते बारावीपर्यंतची स्थिती
यु-डायस प्लसचे वर्ष- 2017-18, 2018-19, 2019-20
शाळांची संख्या- 110315, 109942, 110229
पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थी संख्या- 22560578, 22356033, 22173885
शिक्षक संख्या- 758223, 770125, 783847