राज्यातील 17 साखर कारखान्यांकडे थकली 91 कोटींची “एफआरपी’ 

माळीनगर (सोलापूर) : चालू गळीत हंगामात पाच नोव्हेंबरपर्यंत राज्यात 76 कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांमध्ये 27 लाख 46 हजार टन ऊसाचे गाळप झाले आहे. त्याचा 6.95 टक्के सरासरी साखर उतारा पडला आहे. त्यातून 19 लाख आठ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर आयुक्तालयाने याबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. दरम्यान, मागील हंगामातील राज्यातील 17 कारखान्यांकडे 91 कोटी 63 लाख रुपयांची “एफआरपी’ अद्यापही थकीत आहे. 
राज्यातील गाळप हंगाम 15 ऑक्‍टोबरपासून सुरू झाला. मात्र, हंगामाच्या तोंडावर राज्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाली. परिणामी उसाच्या फडात पाणी साचले. प्रमुख व अंतर्गत रस्तेही अत्यंत खराब झाल्याने वाहने उसाच्या फडापर्यंत जाणे शक्‍य नव्हते. अतिवृष्टी व खराब रस्त्यांमुळे ऊसतोड होऊ शकत नव्हती. त्यामुळे गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. यंदा गाळप सुरू झालेल्या 76 पैकी 35 कारखाने सहकारी व 41 खासगी आहेत. पुणे विभागात सर्वाधिक 17, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद विभागात प्रत्येकी 13, सोलापूर विभागात 12, नांदेड विभागात सात तर अमरावती विभागात एक कारखाना सुरू झाला आहे. नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरू झाला नाही. 

संपादन ः संतोष सिरसट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: FRP of Rs 91 crore to 17 sugar mills in the state

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *