राज्यातील 300 शाळांची “आदर्श शाळा’ उपक्रमासाठी निवड; सोलापूर जिल्ह्यातील 10 शाळा 

वडाळा (सोलापूर) ः शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील जिल्हा परिषदेच्या 300 शाळा “आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांची निवड केली आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्‍यात एक याप्रमाणे राज्यातील 300 शाळांची निवड केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 10 शाळांची निवड केली आहे. शाळांची निवड निकषांच्या आधारे केली आहे. आदर्श शाळा निर्माण करताना भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय बाब अशा तीन महत्त्वाच्या भागांचा यात समावेश असणार आहे. 

निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये भौतिक सुविधेंतर्गत स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीतील वर्ग खोल्या, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय या भौतिक सुविधा सुधारण्यावर भर देणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता अंतर्गत उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण, पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण, व्यवस्थित वाचन लेखन येणे, वाचनावर भर, वाचन सराव, गणित विषयातील मुलभूत संकल्पना, गणिती क्रिया अवगत करणे, शाळेच्या ग्रंथालयात निरनिराळ्या गोष्टींची पूरक पुस्तके असणे, गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये काही प्रशासकीय बाबींच्या अधिन राहून आदर्श शाळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चालू शिक्षणातून विद्यार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास हेच आदर्श शाळेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करुन त्यांच्यामध्ये सर्वांगिण विकास करण्यासाठी विविध उपक्रमांतर्गत क्रीडा, भाषण, लेखन, अभिनय, गायन व इतर विषयांमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी “आदर्श शाळा’ उपक्रम हाती घेतला आहे. 

आदर्श शाळा तयार करताना कौशल्य नवनिर्मितीला चालणा देण्यासाठी समीक्षात्मक, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मुल्ये, संभाषण कौशल्य, इतर कौशल्य आत्मसात करण्यासाठी आवर्जून “आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गात भर दिला जाणार आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे दफ्तराचा ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक शनिवारी दफ्तरमुक्त शाळा असा उपक्रम राबविला जाणार आहे. निवडलेल्या “आदर्श शाळा’ निकषांच्या आधारे निवडल्या गेल्या आहेत. येत्या पंधरा दिवसात याबाबत संबंधित शाळांची पडताळणी करुन निर्णय कळविण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

ही अभिमानाची बाब
आदर्श शाळा उपक्रमासाठी बीबीदारफळ शाळेची निवड ही ग्रामस्थ व ग्रामशिक्षण समितीचे यश आहे. ते गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत अग्रेसर असतात, ही अभिमानाची बाब आहे. यापुढे राज्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षक वर्ग परिश्रम करतात. 
रमाकांत शेरजाळे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, बीबी दारफळ, ता. उत्तर सोलापूर 

संपादन ः संतोष सिरसट 

Leave a Reply

Your email address will not be published.