राज्यात अतिवृष्टीमुळे एक लाख 62 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित 

माळीनगर (सोलापूर) : राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, वादळी वारे व पुरामुळे बाधित झालेल्या क्षेत्राच्या प्राथमिक अहवालानुसार 11 जिल्ह्यातील एक लाख 62 हजार 477 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, हळद, ऊस, मका, भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे. 
राज्याच्या कृषी विभागाने पीक परिस्थितीचा 14 सप्टेंबरअखेरचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. एक जून ते 14 सप्टेंबर कालावधीतील राज्यातील सरासरी पाऊस 908.4 मिलिमीटर असून 14 सप्टेंबर 2020 अखेर 951.5 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 104.7 टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी या कालावधीत 1069.1 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या 117.7 टक्के पाऊस झाला होता. राज्यात यंदा पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत 355 तालुक्‍यांपैकी तीन तालुक्‍यात 25 ते 50 टक्के, 31 तालुक्‍यात 50 ते 75 टक्के, 112 तालुक्‍यात 75 ते 100 टक्के तर 209 तालुक्‍यात 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 
राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 141.98 लाख हेक्‍टर असून 14 सप्टेंबरअखेर 143.39 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (101 टक्के) पेरणी झाली आहे. तसेच राज्यात खरीप पिकांचे ऊस पिकासह सरासरी क्षेत्र 151.33 लाख हेक्‍टर असून 144.64 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (95.58 टक्के) पेरणी/लागवड झाली आहे. मागील वर्षी 16 सप्टेंबर 2019 अखेर राज्यातील ऊस पिकासह पेरणी क्षेत्र 139.88 लाख हेक्‍टर (92.44 टक्के) तर ऊस पीक वगळून पेरणी क्षेत्र 138.73 लाख हेक्‍टर (97.71) टक्के होते. 
राज्यात काही ठिकाणी ज्वारी व मका पिकावर लष्करी अळीचा, भात पिकावर खोडकिडीचा, सोयाबीन पिकावर गर्डल बीटल, हेलीकोव्हर्पा, उंटअळी, खोडमाशी व तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीचा, कापसावर गुलाबी बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी, रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. 14 सप्टेंबर अखेरच्या प्राथमिक अहवालानुसार कीड/रोगाचा प्रादुर्भाव होऊन मूग, उडीद, सोयाबीन व संत्रा, मोसंबी या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मूग 50 हजार 403 हेक्‍टर, उडीद 16 हजार 338 हेक्‍टर, सोयाबीन एक लाख 62 हजार 169 हेक्‍टर व संत्रा, मोसंबीचे सात हजार 641 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Leave a Reply

Your email address will not be published.