राज्यात ‘पिंक रिक्षा’ योजना लवकरच, मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

Aditi Sunil Tatkare News : महिलांना रोजगाराच्या (Women Empowerment) संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकार नवी योजना आणणार आहे. त्याअंतर्गत महत्त्वाच्या शहरांत ‘पिंक रिक्षा’ (Pink rickshaw) ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी जाहीर केले. आदिती तटकरे यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर याचं स्वागत करण्यात आलेय.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या शहरांचा समावेश असू शकतो.

महिला व बालविकास विभागाच्या (Women and child development) योजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात आदिती तटकरे (Aditi Tatkare ) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यामध्ये लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा मानस आहे. महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी गरजू लाभार्थी निवड-निकष तपासून ही योजनाही यशस्वीपणे राज्यात राबवावी, अशा सूचना आदिती तटकरे यांनी दिल्या. लैंगिक अत्याचार आणि बलात्कारांपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने रांचीमध्ये पहिल्यांदा गुलाबी रिक्षा 2013 ला सुरू केली होती. कालांतराने त्या भारतातील इतर अनेक शहरांमध्ये सादर करण्यात आल्या. कायदेशीर पडताळणी आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रशिक्षित व्यावसायिक, मुख्यत्वे महिला या ऑटो चालवतात.

बालधोरणांची माहिती संकेतस्थळावर

राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वसमावेशक असे बालधोरण महिला व बालविकास विभाग तयार करत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागवण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *