लसीकरणाची शिक्षकांवरच जबाबदारी ! लसीकरणावेळी आधार अन्‌ पॅनकार्डची सक्‍ती

सोलापूर : कोरोनावरील लस आता अंतिम टप्प्यात आली असून जानेवारी 2021 मध्ये पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीचा काळाबाजार होऊ नये म्हणून संबंधितांकडे आधार तथा पॅनकार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मतदान यंत्रणेच्या धर्तीवर प्रत्येक शंभर व्यक्‍तींमागे एक बुथ तयार केला जाणार आहे. त्याठिकाणी एक पोलिस कर्मचारी व एका शिक्षकाची नियुक्‍ती केली जाणार आहे.

ठळक बाबी…

  • ऑनलाइन नाव अपलोड केलेला व्यक्‍ती तोच असल्याची खात्री आधार तथा पॅनकार्डद्वारे होणार
  • एका व्यक्‍तीस 28 दिवसानंतर पुन्हा दिला जाणार कोरोना लसीचा दुसरा डोस
  • लस दिल्यानंतर संबंधित व्यक्‍तीस अर्धातास त्याच ठिकाणी डॉक्‍टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार
  • पहिल्या टप्प्यात खासगी, शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला जाईल कोरोनाचा पहिला डोस
  • प्रत्येक 100 व्यक्‍तींसाठी असेल एक बुथ; एक पोलिस व शिक्षकांची केली जाईल त्यासाठी नियुक्‍ती

राज्यातील जिल्हानिहाय वैद्यकीय कर्मचाऱ्यांची माहिती (खासगी व शासकीय) सार्वजनिक आरोग्य विभागाने मागवून घेतली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सव्वा कोटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. त्यानंतर 28 दिवसाच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार असून तत्पूर्वी, पोलिस तथा फ्रंट लाईनवरील कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्‍तींना तर अंतिम टप्प्यात को- मॉर्बिड रुग्णांना लस दिली जाणार आहे. चार प्रकारची लस तयार करण्यात आली असून त्यापैकी महाराष्ट्रासाठी तोंडावाटे तथा इंजेक्‍शनद्वारे दिली जाणारी लस मिळेल, अशी शक्‍यता सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यादृष्टीने जिल्हा, तालुकानिहाय प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी, आशासेविका व अंगणवाडी सेविकांचा समावेश असणार आहे. दुसरीकडे ऑनलाइन पोर्टलवरील नावांची खातरजमा करण्याची मुख्य जबाबदारी निवडणुकीप्रमाणे शिक्षकांवरच सोपविली जाणार आहे.

गावनिहाय शंभर व्यक्‍तींसाठी एक बुथ
लसीचा काळा बाजार होणार नाही, याची दक्षता घेत लसीकरणावेळी संबंधित व्यक्‍तीकडे आधार कार्ड तथा पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे. शंभरजणांसाठी गावनिहाय बुथ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून त्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शहरात महापालिका आयुक्‍तांना देण्यात आले आहेत.
– दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Teachers to be appointed for vaccination! Vaccinators must have Aadhar card and PAN card

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.