लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने त्रिकुटाकडून 2 हजारांच्या बनावट नोटांची छपाई, तिघेही गजाआड

ठाणे : लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने कर्जबाजारी झालेल्या तिघांनी मिळून चक्क भारतीय चलनातील हुबेहूब दिसणाऱ्या 2 हजाराच्या बनावट नोटा बनवल्या. त्या विकायच्या तयारीत असताना त्यांना वागळे गुन्हे शाखा पथकाने अटक केली. त्यांच्याकडे तब्बल 85 लाख 45 हजारांच्या बनावट नोटा, संगणक, प्रिंटर, पेपर्स रिम, शाई, कतार, स्केल, मोबाईल असा मुद्देमाल सापडला आहे. त्यांना न्यायालयात हजार केले असता 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती आज पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

वागळे युनिटने अटक केलेल्या आरोपींमध्ये चिपळूण येथील सचिन गंगाराम आगरे (वय 29) आणि मन्सूर हुसेन खान (वय 45) तसेच अंधेरीत राहणाऱ्या चंद्रकांत महादेव माने (वय 45) यांचा समावेश आहे. यातील आरोपी सचिन याला संगणकाचे चांगले ज्ञान आहे. तो दुबईला नोकरीसाठी जाणार होता. मात्र, त्याला एजंटने दगा दिला. त्यामुळे तो मन्सूर खान याच्या झेरॉक्सच्या दुकानात काम करीत होता. आरोपी मन्सूर खान हा झेरॉक्सचे दुकान चालवीत होता. तर आरोपी चंद्रकांत महादेव माने याचे कोल्हापूरला सोन्या-चांदीचे दुकान होते. ते लॉकडाऊनमध्ये बंद झाले. 40 लाखांचे कर्ज झाले. म्हणून या तिघांनी लॉकडाऊनमध्ये झालेल्या कर्जाची परत फेड करण्यासाठी युक्त्या वापरून 2 हजारांच्या बनावट नोटा, छपाई प्रिंटर, स्कॅनर आणि सॉफ्टवेअरचा वापर करून छापल्या.

पतीच्या वाईट सवयींमुळं कुटुंब संपवलं, नागपुरातील राणे कुटुंबियांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक बाब समोर

बनावट नोटा बाजारात वटविण्याचा प्रयत्न कापूरबावडी परिसरात करत होते. त्याच वेळी वागळे युनिटच्या जाळ्यात ते अडकले. भारतीय चलनातील बनावट नोटा चालविण्यासाठी कापूरबावडी सर्कल येथील बसस्टॉपच्या समोर 2 हजाराच्या बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासवून वटविण्याचा प्रयत्न करीत असल्याची खबऱ्याने खबर दिली असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून छपाईसाठी लागणाऱ्या साहित्यासह 85 लाख 45 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.

पोलिसांना सापडलेल्या साहित्यामध्ये सॉफ्टवेअर आणि प्रिंटर सोबतच आरोपींनी स्क्रीन प्रिंटींगची मदत घेतली होती. विशेषतः या बनावट नोटांचे सिरीयल नंबर मात्र वेगवेगळे होते याची दक्षता आरोपींनी घेतलेली होती. त्यामुळे संशय येत नव्हता. दरम्यान या नोटा दैनंदिन व्यवहारात वापरण्याचा मनोदय आरोपींचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपीच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 489(अ), 489(ब ), 489(क ) आणि 34 प्रमाणे गुहा दाखल केला गेला आहे. त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *