वीस टक्‍क्‍यांवरील शाळांना मिळणार वाढीव अनुदान ! 21 डिसेंबरला होणार पडताळणी

सोलापूर : राज्य सरकारच्या 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या आदेशानुसार मूल्यांकनास पात्र असलेल्या खासगी प्राथमिक शाळांना अनुदान घोषित करणे आणि यापूर्वी 20 टक्‍के अनुदानावर सुरु असलेल्या शाळांची 21 डिसेंबरला (सोमवारी) पडताळणी होणार आहे. त्यासाठी शाळांना आवश्‍यक त्या कागदपत्रांसह माहिती सादर करावी लागणार आहे. त्यासाठी त्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात सादर करावी, असे आदेश शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी काढले आहेत.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशातील ठळक बाबी… 

  • 21 डिसेंबरला सकाळी अकरा वाजेपर्यंत संबंधीत शाळांनी द्यावी सर्व कागदपत्रांची फाईल 
  • शाळांना वाढीव अनुदान मिळणार असल्याने 20 टक्‍क्‍यांवरील शाळांची होईल तपासणी 
  • विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी, त्यांची यादी आणि सोबत आधार कार्ड देणे बंधनकारक 
  • कागदपत्रे विहित नमुन्यात वेळेत द्यावीत; अन्यथा शाळेला अनुदान न मिळाल्यास संबंधीत शाळाच त्यासाठी जबाबदार

राज्यातील काही शाळांना 19 सप्टेंबर 2019 व 1, 2 जुलै 2016 च्या शासन निर्णयानुसार सरसकट 20 टक्‍के अनुदान दिले जात आहे. शाळांना वाढीव अनुदान द्यायचे असल्याने ज्या शाळा पुढील अनुदानास पात्र आहेत, त्यांनी विद्यार्थी संख्येसह अन्य माहिती सादर करावयाची आहे. त्यात अनुदान मंजूर झालेल्या शासन निर्णयाची प्रत, ज्या शाळा घोषित झाल्या, त्या शाळेतील सर्व तुकड्या तथा वर्गाच्या मंजूर आदेशाची प्रत, 2015-17 आणि 2018-19 मधील स्कूल रिपोर्ट कार्ड, मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेतलेल्या रोष्टरची प्रत तथा अल्पसंख्यांकचे प्रमाणपत्र, शाळेची माहिती सरल प्रणालीत भरल्याची प्रत, बायोमेट्रिक उपस्थितीची प्रत, बायोमेट्रिक खरेदी केल्याची पोहच, उपस्थिती नोंद करीत असल्याची फोटो प्रत, शंभर टक्‍के विद्यार्थी आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांची यादी, सोबत सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, शाळेचे मूल्यांकन झाल्याची प्रत आणि आतापर्यंतच्या शासन निर्णयानुसार संबंधित शाळा सर्व अटी व शर्तींची पूर्तता करीत असल्याचे प्रमाणपत्र, अशी कागदपत्रे द्यावीत, असेही शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *