शनिशिंगणापूरप्रमाणेच शिर्डीकरांना हवेत स्थानिक विश्वस्त, साई संस्थान राष्ट्रवादीकडे घ्या

शिर्डी ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन वर्ष लोटले, तरी साईसंस्थानवर विश्वस्त मंडळ नेमले गेले नाही. त्यामुळे येथील विकास ठप्प झाला. हे देवस्थान राष्ट्रवादीने स्वतःकडे घ्यावे व नव्या मंडळात स्थानिकांची निम्मी संख्या ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर यांनी आज माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली. 

पटेल यांनी आज येथे साईसमाधीचे दर्शन घेतले. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत, गौतम बॅंकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संदीप सोनावणे व विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अमित शेळके आदींनी सहभाग घेतला.

हेही वाचा – विधवा भावजयीसोबत लहान दिराने बांधली लग्नगाठ

हा विषय समन्वय समितीपुढे आला, की तुमची बाजू त्यांच्यापुढे मांडू, असे आश्‍वासन पटेल यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले. 
पटेल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इच्छाशक्तीचा अभाव व राजकीय हस्तक्षेपामुळे शिर्डीचा विकास खुंटला.

परिसरात पाहण्यासारखे काही नसल्याने भाविक मुक्कामी थांबत नाहीत. “लेसर शो’सारख्या प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीअभावी सरकारकडे पडून आहेत. त्यास मान्यता मिळावी. 
या वेळी दीपक गोंदकर, शयाद सय्यद, राहुल कुलकर्णी, अमोल बागाईत आदी उपस्थित होते. 

नामांतराचा विषय समन्वय समितीपुढे नाही 

शिवसेना अनेक वर्षांपासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करते. मात्र, राज्य सरकारने तसा निर्णय घेतलेला नाही. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तो तीनही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीपुढे येतो. नंतर तो मंत्रिमंडळ बैठकीपुढे जातो. अद्याप हा विषय समन्वय समितीपुढेच आलेला नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. तसेच, भंडाऱ्यातील घटनेमुळे राज्यात अन्य सरकारी रुग्णालयांत असे प्रकार होणार नाहीत, यासाठी उपाययोजना करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितले आहे, असे ते म्हणाले. 

संपादन – अशोक निंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published.