शिक्षक आमदारांच्या पोस्ट ठरल्या खोट्या; दिवाळीपूर्वी द्या ऑफलाइन वेतन 

सोलापूर ः शिक्षकांच्या प्रश्‍नांसदर्भात अनेक शिक्षक आमदारांनी आवाज उठविला. वाढीव 20 टक्के अनुदानाच्या वितरणाचा आदेश निघणारच अशा पोस्ट या शिक्षक आमदारांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर व्हायरल केल्या. मात्र, त्या पोस्ट खोट्या ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याचा काही परिणाम एक डिसेंबरला होणाऱ्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, सध्या “शालार्थ’मुळे रखडलेल्या शिक्षकांच्या पगारी ऑफलाइन करुन त्यांची दिवाळी आनंदी करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे. 
राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांची नावे शालार्थ प्रणालीत समाविष्ट न केल्यामुळे ऑक्‍टोबरपासून बंद झाले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी आर्थिक संकटाच्या अंधारात जाणार आहे. राज्यातील अंशत: अनुदानित कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे वेळेत देण्याच्या सूचना शासनाने देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. ते टाळण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाइन पद्धतीने देण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे. 
शासनाने “शालार्थ’चे काम लवकर संपवा असे सांगून एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. मात्र, अद्यापही पुणे उपसंचालक विभागातील कर्मचारी व्यक्तिगत भेट घेतल्याशिवाय काम करीत नसल्याने कित्येक कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीत नोंद नसल्याने पगार बंद झाली आहे. याचा फटका या शाळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असणारे पुणे उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी कुणालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. शासनाने ऑफलाईन पगाराचे पत्र काढावे किंवा कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीत तातडीने समाविष्ट करून दिवाळीपूर्वी वेतनाचा प्रश्‍न मार्गी लावावा. पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Teacher MLAs’ posts turned out to be false; Pay offline pay before Diwali

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.