शिवनेरीचा निधी थकला; मुख्यमंत्र्यांनी शिवजयंती सोहळ्याला केलेली घोषणा हवेत

पुणे – छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला २३ कोटींचा निधी आगामी शिवजयंती आली तरी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे पुरातत्त्व, वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणारी विकासकामे रखडली आहेत. आगामी शिवजयंतीपूर्वी हा निधी मिळून कामे सुरु होण्याची अपेक्षा शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीचा स्थापना झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यादांच १९ फेब्रुवारी २०१९ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून शिवनेरी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीच्या घोषणेची अपेक्षा शिवभक्तांना होती. ती त्यांनी २३ कोटींच्या निधीची घोषणा करत पूर्ण देखील केली. सकाळी शिवजयंतीच्या सोहळ्यात घोषणा आणि संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठकीत निधीला मान्यता देखील देण्यात आली होती. एवढी तत्परता महाविकास आघाडी सरकारने दाखविली होती. मात्र, आता शिवजयंतीचा दुसरे वर्ष जवळ आले तरी अद्याप मंजूर केलेला निधी मिळाला नसल्याचे विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या प्रलंबित निधीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच बैठक देखील घेतली. त्यात विविध विभागांना त्यांची प्रस्तावित कामे आणि त्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे विविध विभागांनी आपापले आराखडे सादर करून तीन महिन्यांचा कालावधी झाला. डिसेंबरअखेर देखील हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही.
हद्दीत समाविष्ट करण्याचा अध्यादेश आला; ‘नगरसेवक’ होण्यासाठी इच्छुकांची जोरदार फिल्डिंग
पुरातत्त्व विभागाच्या वतीने अंबरखाना इमारत ते शिवकुंज इमारत दगडी पायवाट, विविध तटबंदीचे संवर्धन, अंबरखाना इमारतीमध्ये संग्रहालय आणि माहिती केंद्र या कामांसाठी ७ कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाला दिला आहे. हा निधी लवकरच मिळून कामाला सुरुवात केली जाईल.
– बी. बी. जंगले, संरक्षक सहायक, पुरातत्त्व विभाग (जुन्नर विभाग)
Breaking News : पुण्यातील शाळा 4 जानेवारीपासून सुरू होणार
शिवनेरी विकास प्रकल्पाच्या निधीच्या मागणीचा तीन विभागांचा सुमारे २३ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. हा निधी लवकरच मिळून संबंधित विभागांकडे वर्ग केला जाईल. शिवजयंतीपूर्वी विविध विकासकामांना सुरुवात होईल.
– संजय मरकळे, जिल्हा नियोजन अधिकारी
शिवनेरी विकास प्रकल्पासाठी आम्ही सातत्याने विविध विभागांसोबत समन्वय साधत असतो. अंबरखाना इमारतीमध्ये सातवाहन, शिवकालीन संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारावे, अशी मागणी आम्ही गेली अनेक वर्षांपासून करत आलोय. त्यानुसार संग्रहालयासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात उल्लेख आहे. हा निधी लवकरात लवकर पुरातत्त्व विभागाला मिळून काम सुरु व्हावे, एवढीच आमची अपेक्षा आहे.
– कृष्णा देशमुख, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर
मंजूर निधी
- ७ कोटी – पुरातत्त्व विभाग
- ५ कोटी – वन विभाग
- ११ कोटी – सार्वजनिक बांधकाम विभाग
- २३ कोटी – एकूण
Edited By – Prashant Patil