शेतमाल तारण योजना वरदान, राज्यात 3642 शेतकऱ्यांना 35.92 कोटी कर्जवितरण

कऱ्हाड (जि. सातारा) : शासनाच्या पणन मंडळांतर्गत सुरू असलेल्या शेतमाल तारण या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जुलै अखेरपर्यंत तीन हजार 642 शेतकऱ्यांनी 94 बाजार समित्याअंतर्गत एक लाख 61 हजार क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना 35 कोटी 92 लाखांचे कर्जवितरण करण्यात आले आहे. 

वादळ, वारा, पाऊस, ओला व कोरडा दुष्काळ, कीडरोगाचा प्रादुर्भाव या ना अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करून शेतकरी मोठ्या हिमतीने आपल्या शेतात पिके घेतो. दर हंगामाला नवीन संकट शेतकऱ्यांपुढे उभे असते. त्यावरही मात करून शेतकरी सुधारित तंत्रज्ञानाने शेती करून चांगले उत्पन्न घेतो. उत्पन्न वाढले की शेतकरी बाजारपेठेत ते विक्रीसाठी आणतो. एकाचवेळी सर्वच शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीस आणला गेल्याने आवक वाढली की दर ढासळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे जादाचे मिळायच्या ऐवजी त्यांना पीक घेण्यासाठी पदरमोड करून, कर्ज घेऊन घातलेले पैसेही मिळणेही मुश्‍कील बनते.

शेतकऱ्यांकडे शेतमाल साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था नसते. जरी कोणी ठेवलाच तरी तो भिजणे, त्याला किड लागणे यासह अन्य बाबी होऊन त्याचे नुकसान होते. गेले अनेक वर्षे हे रहाटगाडगे असेच सुरू आहे. त्यामुळे चांगली शेती करूनही शेतकऱ्यांच्या पदरी कर्जच होते. त्याचा विचार करून शासनाने पणन मंडळामार्फत शेतमाल तारण योजना सुरू केली. ज्यावेळी शेतमालाचे दर बाजारपेठेत पडतात. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल बाजार समित्यांच्या किंवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा आणि ज्यावेळी चांगला दर येईल, त्यावेळी तो विकावा, असे सूत्र त्याला लावण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा होऊ लागला आहे. ज्यावेळी शेतकरी वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल ठेवतो, त्यावेळी त्याला खर्चासाठी किंवा कर्ज भागवण्यासाठी शेतमालाच्या किंमतीच्या 75 टक्के रक्कम सहा महिने मुदतीसाठी सहा टक्के व्याजदराने वापरण्यास दिली जाते. त्याने ती रक्कम सहा महिन्यांच्या मुदतीत ज्यावेळी दर येईल आणि शेतमाल विकायचा असेल त्यावेळी भरून शेतमाल विकायचा असतो. त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. या योजनेंतर्गत जुलै अखेरपर्यंत तीन हजार 642 शेतकऱ्यांनी शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामात ठेवला आहे. राज्यातील 94 बाजार समित्यांतर्गत एक लाख 61 हजार क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना 35 कोटी 92 लाखांचे कर्जवितरण करण्यात आले आहे. 

…या पिकांसाठी मिळते कर्ज 

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे व्यवस्था नसते. त्यामुळे शेतमाल खराब होण्याची भीतीही असते. त्यामुळे शेतमाल तारण योजनेत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ठेवावा, असे सूचीत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत शेतकरी तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, हरभरा, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू, बेदाणा, सुपारी व हळद ही पिके वखार महामंडळाच्या गोदामात ठेऊ शकतात. या पिकांवर शेतकऱ्यांना कर्जही दिले जाते. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

Leave a Reply

Your email address will not be published.