शेती पिकांच्या भरपाईसाठी ‘एनडीआरएफ’मधून द्या मदत ! मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

सोलापूर : विदर्भातील नागपूर विभागाअंतर्गत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, तसेच मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, तर उत्तर महाराष्ट्रातील नगर, नंदूरबार, जळगाव, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सोलापूर या जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. तर यापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळेही तब्बल 27 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आता जुलै ते सप्टेंबर या काळात शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे एकत्रित पंचनामे करुन त्याचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश मदत व पुनर्वसन विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
ठळक बाबी…
- विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना अतिवृष्टी, पूर अन् परतीच्या पावसाचा तडाखा
- कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 78 हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान
- शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अहवाल एकत्रित सादर करा; मदत व पुनर्वसन विभागाचे विभागीय आयुक्तांना पत्र
- जुलै ते सप्टेंबरपर्यंतचे एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश; कोरोना अन् पावसामुळे पंचनामे अपूर्णच
- 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या पिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागितली ‘एनडीआरएफ’मधून मदत
अतिवृष्टी, पूर, परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 70 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, कापूस, ऊस या पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अद्याप काही जिल्ह्यांमधील गावांमध्ये शेती पिकांचे नुकसान होऊनही पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही. कार्यालयात बसूनच भाऊसाहेब आढावा घेऊ लागल्याच्या तक्रारी शेतकरी करु लागला आहे. काही दिवसांत कारखान्याला जाणारा ऊस, नुकतीच लागवड केलेले टोमॅटो, कांदे पावसात वाहून गेले आहेत. तर अनेक ठिकाणी फळबागा झोपल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
केंद्राकडे जाणार मदतीसाठी प्रस्ताव
पावसामुळे ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे, त्यांना राज्य व केंद्र सरकारकडून मदत दिली जाणार आहे. नुकसानीचे पंचनामे अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्तांना ‘एडीआरएफ’मधून मदत मिळावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला जाईल.
– सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई