संभाजी पवार : ग्राऊंड झिरोचा विरोधक आमदार

चांदा ते बांदा आणि चांदोली उमदी कॉंग्रेसचं राज्यात आणि जिल्ह्यात साम्राज्य असताना वसंतदादांचे पुतणे आणि राजकारणातील चाणाक्ष नेते विष्णूअण्णा पाटील यांना सांगलीच्या बालेकिल्ल्यात 1986 च्या पोटनिवडणुकीत एका पैलवानानं ढाक मारली. तो पैलवान कोण याची चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचली. संभाजी पवार या नावाचं 1986 ते 2009 पर्यंत सांगलीवर त्यांचं राजकीय गारुड होतं. सतत लोकांत राहणारे ते ग्राऊंड झिरो आमदार होते. 

सहकारी संस्थांच्या कॉंग्रेसच्या भरभक्कम पकडीतही फट शोधून त्यांनी कॉंग्रेसच्या रथी-महारथींना अनेकदा अस्मान दाखवले. केवळ नाराज कॉंग्रेसजणांच्या मदतीवर त्यांनी हे यश मिळवले असं म्हणणं मात्र त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. शहरात, सांगलीच्या आजूबाजूच्या गावागावांत फाटके कार्यकर्ते त्यांनी उभे केले. त्यांना विरोधाचं बळ दिले. हमाल, रिक्षाचालक, फेरीवाले, एसटी कामगार, भाजीपाला विक्रेते, खोकीवाले, शेतमजूर, दलित कार्यकर्ते अशा समाजातील वंचित घटकांना त्यांनी भरभक्कम राजकीय आधार दिला. कधी ते त्यांच्या रस्त्यावरच्या लढाईचा भाग झाले तर कधी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर मूठ आपटून त्यांनी त्यांच्यासाठी जाब विचारला. छोट्या-छोट्या निदर्शने आंदोलनात घोषणा देत सहभागी होणारा हा आमदार होता. अशा वंचित घटकांचा नेता राजकीय मैदानावरही यशस्वी होणे आता दुर्मिळच. ते भाग्य आप्पांना लाभले. आप्पा अशा वंचित घटकांचे हक्काचे आमदार होते. 

देशभरातील शेतकऱ्यांना हाक देणाऱ्या शरद जोशी यांना पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलनात झोनबंदीच्या रुपाने पहिले राजकीय यश मिळाले असेल तर ते आप्पांच्या आंदोलनामुळेच. ऍड. व्यंकाप्पा पत्की आणि प्रा. शरद पाटील आणि पवार या जनता दलाच्या त्रिकुटाने व्ही. पी. सिंग यांच्या जनता दलाला राज्यात पोहोचवण्यासाठी केलेली धडपड हे डाव्या-समाजवाद्यांच्या राजकारणाचा शेवटची यशस्वी कृती होती. हुशार कुस्तीगीर असलेल्या पवार यांनी लोकसमुहाचं मानस जाणत अनेक राजकीय मैदाने जिंकली. निवडणुकीचा माहोलात कोणत्या विधानाची बातमी होईल याचं पक्क भानं असणारा हा कसलेला राजकीय पैलवान होता. पालिका राजकारणाची माती अंगाला लावून न घेताही त्यांनी तिथं विरोधकांची यशस्वी भूमिका ठासून केली. 

साधेपणा, सतत लोकात मिसळणे, त्यांना उपलब्ध असणे ही त्यांची ओळख शेवटपर्यंत होती. मारुती चौकातील त्यांच्या सताड उघड्या कार्यालयातील त्यांचे मुक्त दर्शन आणि तिथला लोकांचा सहज वावर सर्वांना आधार देणारा असे. तिथे कधी ऍन्टीचेंबरचे बदलत्या राजकारणाचे फॅड डोकाऊ दिले नाही. जागेवर प्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लावताना त्यांना “पारदर्शक’तेची वेगळी जाहिरात करावी लागली नाही. कार्यकर्त्यांच्या घरगुती समारंभातील त्यांची हजेरी कार्यकर्त्यांना कायमची जोडून घेणारी असायची. फाटक्‍या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून स्कूटरवर बसलेले आप्पा पुढारी कधी वाटलेच नाहीत. त्याचं कार्यालय, वखारभागातील आधीच कौलारू घर आणि नंतरचं साधं गाळेवजा घर ही त्यांच्या साधेपणाची कायम ओळख राहिली. त्यांचा हा साधेपणा त्यांच्या सौभाग्यवतींनीही आभूषण म्हणून स्वीकारला आणि तशा त्या आयुष्यभर जगल्या. मारुती चौकातील विजयंत मंडळाचा गणेशोत्सव, वडिल हरिनानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारे कुस्ती मैदान हेन नेहमीच त्यांच्या उपस्थितीने भारलेले असायचे. 

आप्पांनी संस्थात्मक राजकारण केलं नाही हा त्यांच्यावरचा सर्वात मोठा आक्षेप. एखाद्या नेत्याच्या कामाचं मूल्यमापन त्याला त्याच्या कालखंडापासून-पुर्वेइतिहासापासून वेगळं करून करता येत नाही. तो असतो तत्कालीन समाजाच्या अपेक्षांचं “प्रॉडक्‍ट’. नेता आणि समाज परस्परांना घडवतात. पवारांमध्ये सांगलीकरांनी कधी सत्ताधारी पाहिला नाही. ते त्या भूमिकेत जायचा प्रयत्न करायचे तेव्हा लोकांनी त्यांना रोखले. ते सांगलीकरांसाठी नेहमीच हक्काचे विरोधक आमदार राहिले. त्यासाठीच जणू लोकबळ त्यांच्या मागे राहिले.

नियती अशी की कॉंग्रेस विरोधकांना ज्या ज्या वेळी सत्तासंधीचे द्वार उघडले तेव्हा ते विरोधकाच्या भूमिकेतच होते. आप्पा म्हणजे लोकांनी स्वीकारलेल्या आणि घडवलेला जातीचा विरोधक आहे. जे आज दुर्मिळ झालं आहे. सत्ताधाऱ्यांना नव्हे विरोधकांनाच प्रश्‍न विचारण्याचा आजचा कालखंड आहे. सतत सत्तेच्या वळचणीला राहणाऱ्यांना विरोधक तरी कसे म्हणायचे? अशा काळात आप्पासारखा एक आमदार होता, जो सतत प्रवाहाच्या विरोधात उभे ठाकतानाच नव्हे तर प्रवाहात सामील होतानाही आपली विरोधाची धार शाबूत ठेवायचा. अशा जातीच्या विरोधी आमदाराच्या उरल्या आता फक्त आठवणी. 

संपादन : युवराज यादव 

Leave a Reply

Your email address will not be published.