समाजमाध्यमे आणि भाषासमृद्धी

आजच्या काळाचा उल्लेख ‘समाजमाध्यमोत्तर समाज’ असा करायला हरकत नाही, एवढा प्रचंड हस्तक्षेप आणि विलक्षण पगडा मानवी जीवनात समाजमाध्यमांनी निर्माण केलेला आहे, जो खऱ्या अर्थानं उपकारकच म्हणता येईल. ही वर्तमान जगातील संपर्काची, संवादाची, अभिव्यक्तीची अतिशय प्रभावी माध्यमं ठरली आहेत. मुक्तपणे आपले विचार मांडण्याची हक्काची स्पेस, एक प्रकारचं खुलं व्यासपीठच. ही सामाजिक माध्यमं सामान्य माणसांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अधिक ताकद बहाल करणारी ठरली. या माध्यमांचा वापर ‘लोकल टू ग्लोबल’ वाढत चाललेला आहे. इथं माणसं वेगवेगळ्या ॲपद्वारे एकमेकांशी जोडली गेलीत. या माध्यमांचं स्वरूप काहीसं बहुरंगी आहे. याला इन्फोर्मेशनल विंडो, कम्युनिकेशनल विंडो, एज्युकेशनल विंडो, करिअर विंडो, एंटरटेन्मेंट विंडो आणि वॉररूम विंडो अशी नावे देता येतील. या माध्यमांवर केवळ आजचीच पिढी नाही, तर मागच्या-पुढच्या अनेक पिढ्या आकर्षित झाल्या आहेत आणि उत्तम पद्धतीनं व्यक्तही होताहेत. खरं तर ही समाजमाध्यमं माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रीकरण करायला जशी मदतगार ठरलीत, तशीच सांस्कृतिक प्रसार-प्रचार आणि संवर्धनासाठीही उपयुक्त ठरत आहेत. भाषिक समृद्धीच्या दृष्टीनेही उपकारक आहेत.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
समाजमाध्यमे आणि मराठी
सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, शैक्षणिक, कलात्मक देवाणघेवाणीतून भाषा समृद्ध होत असते. असं समाजमाध्यमांवर मराठी भाषेच्या संदर्भात घडताना दिसतंय का? तर ही माध्यमे मराठी भाषेच्या विकासासाठी पूरकच ठरली आहेत. इथं व्यक्त होताना भाषेचा आणि भाषेच्या विविध प्रारूपांचा अडसर येत नाही, ही या माध्यमांची आणखी एक जमेची बाजू. मराठी भाषेच्या दृष्टीनं सकारात्मक बाब हीच, की सोशल मीडियावर मराठी भाषेचा वापर वाढलेला आहे. आरंभी या माध्यमांवर इंग्रजी भाषेचाच वापर केला जाई, कालांतरानं देवनागरी लिपीचा वापर होऊ लागला. नव्या पिढीलाही आपल्या मातृभाषेत संवाद साधायला, अभिव्यक्त व्हायला आवडत आहे. खरं तर आपल्या भाषेत संवाद साधणं, व्यक्त होणं सहज सोपं आणि तितकंच प्रभावी असतं, हा आजच्या पिढीचा अनुभव आहे. यामुळं जगभरात मराठी भाषा पोचायला मदत होणार आहे हे नक्की आहे.
CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा निकाल
या सर्व समाजमाध्यमांमध्ये व्यवसाय आणि जाहिरातीचं खूप मोठं साम्राज्य आहे. त्याकरिता जगातले सर्व घटक तुमच्या भाषेतून तुमच्यापर्यंत पोचताहेत. त्यामुळंही मराठी भाषेचा वापर समाजमाध्यमांवर वाढलेला दिसतो. ही संपूर्ण यंत्रणा मराठी भाषेत कार्यरत होणं ही मराठीच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे.
भाषा कुठलीही असो, प्रत्यक्ष जगण्यातली, माध्यमातली वा समाजमाध्यमातली, तिची बुज तिच्या आशयाच्या गाभ्यात सामावलेली असते. आशयाच्या अभिव्यक्तीवरच भाषेचं स्वरूप अवलंबून असतं, म्हणून समाजमाध्यमांवरील भाषेचा विचार करताना माध्यमांवरील अभिव्यक्तीचा विचार. समाजमाध्यमांचे पर्यावरणही महत्त्वाचे आहे. त्याशिवाय माध्यमांवरील भाषेचे स्वरूप नेमकेपणाने सांगणे अवघड आहे. जगण्याच्या पर्यावरणाबरोबरच समाजमाध्यमांवर तुम्ही काय वाचता, बघता, ऐकता यातून तुमच्या विचारांची भाषा तयार होत असते. माध्यमांवरची मराठी भाषा माध्यमं बोलत नसून आपणच बोलत असतो, ती आपली व आपल्या समाजाच्या सृजनाची भाषा असते.
‘मारहिलिश’ भाषा!
समाजमाध्यमांवरची मराठी भाषा ही स्वैर स्वरूपाची, लेखन नियमांचे संकेत टाळून, भाषिक चौकट मोडून साकारतेय. शुद्ध-अशुद्ध, प्रमाण बोली, ग्रामीण नागरी लोकभाषा जनभाषा याच्या सर्व सीमारेषा धूसर झालेल्या दिसतात. ही भाषा बहुरंगी, बहुढंगी, बहुपदरी आहे. कारण वृत्ती-प्रवृत्ती, भाव-स्वभाव, वय, लिंग, प्रदेश परिस्थिती, जनसमुदाय आदीनुसार तिचा पोत आणि पदर, आशय आणि अभिव्यक्ती अनुभवायला मिळते. या भाषेला वेगवेगळे आयाम आहेत. नाना भाषिक आविष्कार मराठी भाषेत होतील याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मीडियानं प्रत्येकाला आवाज तर दिलाय, पण भाषा घडविण्यात-बिघडविण्यातही त्यांचा वाटा आहे. यावर वापराचे कसलेच निर्बंध नसल्यानं भाषेची शिस्त, सौंदर्य, श्रीमंती हरवून जात आहे, याकडंही लक्षवेध करावा वाटतो. इथली मराठी भाषा ही बऱ्याच अंश ‘मारहिलीश’ अशी बहुभाषिक मिश्रण असलेली आढळते. आधुनिकीकरण, नागरिकीकरणामुळं आपला समाज बहुभाषिक पर्यावरणातला समाज बनत चालला आहे. त्याचं प्रतिबिंबही समाजमाध्यमांवरील मराठी भाषेत दिसून येत आहे. या माध्यमांमुळं वेगवेगळ्या भाषा, बोली, एकमेकींच्या जवळ येण्यातून भाषेला नवं रूप प्राप्त होत असते, यातूनही काही तरी भाषिक नवोत्सर्जन व्हायला मदत होईल.
दर्जा आणि शिस्तीचा अभाव
माध्यमांवरची भाषा प्रचारकी स्वरूपाची आहे. तिच्यात कृत्रिमता, रुक्षपणा, नाटकीपणा, दिखाऊगिरी अधिक जाणवतो, कारण इथं सारेच आभासी आहे. या भाषेला सेन्सॉरशिप नसल्यामुळं समाजविघातकी, मनोवृत्तीचा विक्षिप्तपणा वाढलेला दिसतो. त्याच प्रकारची मूल्यविवेक हरवलेली, विखारी स्वरूपाची एकात्मतेला भंग करणारी दिसते. चंगळवादी, बाजारकेंद्री मनोवृत्तीतून अधिकांशतेने कॉपी-पेस्टची बनत जातेय. तद्वतच ती संक्षिप्त आहे, तिचा संकोच होतोय. अक्षरलिपी, चिन्हांची जागा आता चित्र चिन्ह, इमोजी, विशिष्ट खुणांनी घेतलीय. माध्यमांवर लेखन वाढलंय, पण दर्जा आणि शिस्तीचं काय? या भाषेत विनोद आहेत, वैचारिक वाद-प्रतिवाद आहेत; पण ते निव्वळच द्वेषभावना नि भाषिक थिल्लरपणाच अधिक जाणवतोय. इथे एका नव्या भाषेने जन्म घेतलेला आहे ती म्हणजे ट्रोलिंगची भाषा. या भाषेत केवळ कॉपी-पेस्टचा उद्योग चालतो. तिथे नवसृजनाची शक्यता मरून जाते.
समाजमाध्यमांच्या जशा अनेक उणिवा आहेत, त्यातलीच एक भाषिक उणीव म्हणजे या माध्यमावरील भाषा एकसुरी, सनसनाटी, बटबटीत आहे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वापरण्यात येणारी भाषा दुसऱ्याला त्रासदायक होणार नाहीस इतपत आपली भाषा नक्कीच प्रतिष्ठित असायला हवी.
आपल्या हातात आलेल्या समाजमाध्यमांवर वापरली जाणारी भाषा सर्वांनी जबाबदारीपूर्वक वापरल्यास समाजाचे स्वास्थ्य बिघडणार नाही आणि विवेकशील समाज निर्माणासाठी हितावह ठरेल. मूल्यनिर्मिती, समृद्ध विचार, सकारात्मक चिंतन, विधायक चर्चा जी मराठी भाषेला नि भाषिक अभिव्यक्तीला समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहे, ती समाजमाध्यमांवर अभिव्यक्त व्हायला हवी. तेव्हा ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ मराठी भाषा समाजमाध्यमांवरही आपला नीरक्षीरविवेक जपत तिचा शब्दन् शब्द जगभर पोचावा, असेच मनोमन वाटते.
(डॉ. वीरा राठोड यांना २०१५मध्ये ‘सेन साई वेस’ या काव्यासाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे.)
Edited By – Prashant Patil