सरकारचे “यूजीसी’कडे बोट ! “एटीकेटी’ विद्यार्थ्यांसमोर नवा पेच

सोलापूर : राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांमधील प्रथम, द्वितीय आणि अंतिम वर्षातील “एटीकेटी’च्या सुमारे 19 लाख 67 हजार विद्यार्थ्यांबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. वाढत्या कोरोना संसर्गामुळे आता परीक्षा घेण्यास अडचणी असल्याचे विद्यापीठांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, शासन-राज्यपाल आणि यूजीसी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या विद्यार्थ्यांना पदवी तथा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक वर्ष आगाऊ द्यावे लागणार आहे. 

हेही वाचा : भोसे गाव झाले पोरके; राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन, कुटुंबातील तिसरा मृत्यू 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या आदेशानुसार “एटीकेटी’सह सर्वच विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. मार्च-एप्रिलमध्ये एटीकेटीसह सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते आणि तिथून अभ्यासक्रमाला सुरवात होते. यंदा कोविड-19 मुळे परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. सरकारने प्रथम व द्वितीय वर्षाची परीक्षा रद्द करीत मागील गुणांच्या सरासरीवरून सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या सत्रात प्रवेश दिला. तर अद्याप अंतिम वर्षातील परीक्षेचा तिढा सुटलेला नाही. मात्र, आता “एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांचा नवा प्रश्‍न समोर आला असून, त्यांची परीक्षा ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये न झाल्यास त्यांना 2019-20 मधील राहिलेले विषय आणि 2020-21 मधील पुढील सत्रातील सर्वच विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. याबाबत शासनाने आता “यूजीसी’कडे बोट दाखविल्याने पालकांची चिंता वाढली आहे. 

हेही वाचा : बेरोजगारी वाढली ! नोकरी लागत नसल्याने तरुणाची आत्महत्या 

शासनाच्या आदेशाची विद्यापीठाला प्रतीक्षा 
प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने शासनाच्या आदेशानुसार या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जात आहेत. दुसरीकडे “एटीकेटी’ विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, त्यांनाही मागील गुणांच्या सरासरीवरून तथा प्रात्यक्षिक गुणांच्या सरासरीवरून उत्तीर्ण करायचे, याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्यांचा निकाल प्रलंबित ठेवला आहे, असे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा यांनी सांगितले. 

ठळक बाबी… 

  • 13 अकृषिक विद्यापीठांमधील “एटीकेटी’ विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 20 लाखांपर्यंत 
  • कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने होईना परीक्षेचा निर्णय 
  • “एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारचे “यूजीसी’ला पत्र 
  • पालकांकडून घेतले जाणार संमतीपत्र; विद्यार्थ्यांना स्वत:च घ्यावी लागणार आरोग्याची काळजी 
  • अपग्रेडेशनसाठी अर्ज भरून दिले, मात्र अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय नाहीच 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Leave a Reply

Your email address will not be published.