सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण! सणासुदीसाठी सुरू केलेल्या विशेष रेल्वे ऐन दिवाळीतच होणार बंद

परभणी : खास दिवाळीसाठी सुरू करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असून व्यवसाय कमी होत असल्याचे कारण पुढे करीत दक्षिण मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करीत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या 4 विशेष रेल्वे ऐन दिवाळी सणातच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील सहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वे सेवा दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने सुरू केली होती. या विशेष रेल्वे सुरू करताना रेल्वे विभागाने प्रवाशांना आरक्षण करणे सक्तीचे केले होते. त्यामुळे सर्वच गाड्यांना आरक्षणाशिवाय प्रवास करणे शक्य नसल्याने प्रवाशांनीही सणाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण करीत प्रवास करणे पसंत केले होते. परंतु रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असून व्यवसाय कमी होत असल्याचे कारण पुढे करीत दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वे ऐन दिवाळी सणातच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे विभागाने काही ठराविक विशेष रेल्वेही सुरू केल्या. ज्यात दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड – पनवेल – नांदेड, धर्माबाद नांदेड धर्माबाद, काचिगुडा नरखेड काचिगुडा, काचिगुडा अकोला काचिगुडा या रेल्वे 23 ते 28 ऑक्टोबरच्या दरम्यान मोठा गाजावाजा करत सुरू केल्या. या सर्व रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आरक्षण गरजेचेच असल्याची अट घातली. मात्र या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे सांगून सर्व रेल्वे जाहीर केलेल्या तारखेच्या आधीच बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ज्यात नांदेड पनवेल नांदेड (क्र.07614 व 13) ही 23 व 24 ऑ्क्टोबरला सुरू केली होती. ती 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे म्हटले होते. मात्र, ही रेल्वे नांदेड येथून 23 व पनवेल येथून 24 नोव्हेंबरपासून रद्द (बंद) करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

धर्माबाद मनमाड धर्माबाद (क्र. 07688 व 87) ही रेल्वे 24 ऑक्टोबर रोजी सुरू केली होती. ती पण 30 नोव्हेंबरपर्यंत धावेल असे म्हटले होते. मात्र, 15 नोव्हेंबर (रविवारी) ऐन दिवाळीमध्येच रद्द (बंद) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दिवाळी सण समोर ठेवून सुरू केलेली ही दिवाळीच्या दिवशीच बंद करण्यात येणार आहे. याचबरोबर तिरूपती – कोल्हापूर तिरूपती (क्र. 07415 व 16) ही रेल्वे 28 व 30 ऑक्टोबरपासून सुरू केल्या होत्या. मात्र, तिरूपतीहून गुरुवार (दि.12) रोजी तर कोल्हापूर येथून धावणारी 14 नोव्हेंबर रोजी शेवटचा प्रवास करेल असे म्हटले आहे.

या शिवाय काचिगुडा नरखेड काचिगुडा (क्र.07641 व 42) विशेष रेल्वे 23 व 24 ऑक्टोबरला सुरू केली होती. ती 29 व 30 नोव्हेंबरपर्यंत धावणार होती. मात्र, ही विशेष रेल्वे काचिगुडा येथून 14 नोव्हेंबरला तर नरखेड येथून 15 नोव्हेंबरला शेवटचा प्रवास करणार आहे. काचिगुडा अकोला काचिगुडा (क्र.07639 व 40) ही रेल्वे 26 व 27 ऑ्कोटबरला सुरू केली होती. ती 23 व 24 नोव्हेंबरपर्यंत असेल असे जाहीर केले होते. मात्र, ही विशेष रेल्वेही 16 नोव्हेंबरला काचिगुडा येथून तर अकोला येथून 17 नोव्हेंबरला शेवटचा प्रवास करेल, असे दक्षिण मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.