सुफीयानच्या केवळ आठवणींसह ते गावकडच्या वाटेला लागले…

शिराळा (जि. सांगली) : गेले वर्षभर तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेला काळजाचा तुकडा क्षणार्धात डोळ्या समोर मातीआड झाला. चिमुकल्याच्या आठवणीने घायाळ झालेले माता – पिता जड अंतःकरणाने बाळाचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून तडवळे येथून गावकडच्या वाटेला लागले. 

पोराच्या शिक्षणाची आभाळभर स्वप्नं घेऊन त्याच्यासह बाहेर पडलेल्या आई – वडिलांवर पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर करून बाळाला तिथेच सोडून पुन्हा माघारी फिरण्याची वेळ आली. त्यावेळी खोपट्यावर भयाण शांतता पसरली. उपस्थित सर्वांचे डोळे पाणवले. 

आपल्या नशिबी आलं ते आपल्या पोरांच्या नशिबी येऊ नये, म्हणून आई-वडील रात्रंदिवस काबाडकष्ट करतात. त्याच प्रमाणे मुलांना चांगलं शिक्षण देऊ म्हणून हातात कोयता घेवून आनंदगाव (ता. माजलगाव, जि. बीड) येथील शमशुद्दीन निजामुद्दीन शेख हे पत्नी व एक वर्षाच्या सुफीयान मुलाला सोबत घेऊन बाहेर पडले. शिराळा तालुक्‍यात ऊस तोड मजूर म्हणून दाखल झाले. शमशुद्दीन यास दोन मुले. मोठी मुलगी व लहान मुलगा. मुलगी चार वर्षांची असल्याने ती गावीच थांबली होती. सुफीयान एक वर्षाचा असल्याने सोबत आणला होता. 

त्यांचे नेहमी प्रमाणे तोडणीचे काम सुरू होते. संसार सुखाने सुरू होता. सोमवार (22 फेब्रुवारी) त्यांच्यासाठी घातवार बनून आला. त्याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास शमशुद्दीन शेख पत्नी व एक वर्षाच्या मुलासह ऊस तोडणीसाठी तडवळे येथे शेतात गेले. तडवळे येथील मानकांडे शेतात कृष्णात शामराव पाटील यांचा ऊस तोडत असताना मुलगा सुफीयानला निलगिरी झाडाखाली सावलीला मेहुणीची सात वर्षांची मुलगी तरनुमसोबत ठेवले.

सर्वजण ऊस तोडण्यात मग्न होते. तरनुम पाणी पीत असताना अचानक उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागून सुफीयानवर झडप घालून त्याची मान पकडून त्यास आई-वडिलांसमोर फरफटत नेले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शेख कुटुंबीयांवर शोककळा पसरली. गाव जवळ नसल्याने सुफीयानला शिराळा येथेच दफन केले. चार दिवस ऊसतोडणी मजुरांच्या खोपटावर शांतता होती. ऊस तोडणी बंद होती. 

याद सतवणार म्हणून…
ज्याच्यासाठी राबायचं तोच नाही. इथे राहिलो तर बाळाच्या आठवणी सतावत राहणार म्हणून शेख कुटुंबाने कोयता सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला. बाळाचा चेहरा डोळ्यात साठवून त्याच्या आठवणी उराशी बाळगून त्यांनी गावाकडची वाट धरली. त्यांना निरोप देताना खोपट्यावरील सर्वजण गहिवरले. 

संपादन : युवराज यादव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *