सोनू सूद म्हणतो, साईबाबांनीच लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करायला सांगितलं

शिर्डी ः “मै केवल ऍक्टर नही, आपका सेवक भी हूँ..’ अशा शब्दांत सिनेअभिनेता सोनू सूद यांनी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत संवाद साधला.
आयुष्याच्या सायंकाळी सर्वस्व गमावून निराधार झालेल्या वृद्धांची सेवा करणारे आश्रमचालक श्रीनिवासन यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. “रंजल्या-गांजल्यांची सेवा करणे, हेच खरे साईंचे कार्य आहे. ते तुम्ही करीत राहा, गरज पडली तर मला मदतीला बोलवा..’ अशा शब्दांत भावना व्यक्त करीत त्यांनी वृद्धाश्रमाचा निरोप घेतला.
सोनू सूद यांचे आज सकाळी अकराच्या सुमारास येथे आगमन झाले. साईसंस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी त्याचे स्वागत केले. नंतर त्यांनी साईमंदिरात साईसमाधीचे दर्शन घेतले. मध्यान्ह आरतीस हजेरी लावली.
हेही वाचा – नगरचा लष्करी तळ हलविण्याच्या हालचाली
साईदर्शनानंतर त्यांनी द्वारकामाई वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील निराधार वृद्धांसोबत हितगूज केले. त्यातील बऱ्याच जणांना त्यांनी दोन्ही हात जोडून “मै कौन हूँ’ असा प्रश्न केला. त्यातील बऱ्याच जणांनी “आप ऍक्टर हो’ असे उत्तर दिले. त्यावर “मै ऍक्टर हूँ और आपका सेवक भी हूँ..’ असे सांगत परिचय करून दिला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “”कोविडमुळे स्थलांतर करणाऱ्या साडेसात लाख गरजूंना मदत करता आली. माझा परिवार किती विस्तारला आहे, ते पाहा. त्यात दिवसागणिक भर पडते आहे. तो विस्तारतच राहणार आहे. कारण, साईबाबांनी दिलेल्या वाटेवरून निघालो आहे. रोजगार व वैद्यकीय मदतीमुळे लोक जोडले जात आहेत. आता आयुष्यभर याच रस्त्यावरून चालायचे ठरविले आहे. बाबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली. ती मला पूर्ण करायची आहे.”
हॉटेलवरील कारवाईबाबत ते म्हणाले, “”आपण सर्वजण बाबांच्या दरबारात आहोत. येथे अन्य गोष्टींची चर्चा कशाला? बाबांचे दर्शन झाले, मन स्वच्छ झाले. नवा उत्साह, नवी ऊर्जा मिळाली. मी माझे सेवाकार्य सुरू ठेवणार आहे.”
बाबांनी रस्ता दाखविला
सोनू सूद म्हणाले, “”वर्षभरापूर्वी साईदर्शनासाठी येथे आलो होतो. त्यावेळी मला पुढील आयुष्याचा रस्ता दाखवा, अशी प्रार्थना केली होती. बाबांनी मला हा सेवाकार्याचा रस्ता दाखविला. आता आयुष्यभर याच रस्त्याने चालायचे ठरविले आहे.” अहमदनगर
संपादन – अशोक निंबाळकर