सोलापूर महानगरपालिकेत राजकीय भुकंप होणार?, एमएमआयएमचे 7 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश कऱण्याची शक्यता

सोलापूर : भाजपची सत्ता असलेल्या सोलापूर महानगरपालिकेत राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक तौफीक शेख यांनी आपल्या 7 नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. तौफीक शेख हे आधी क़ाँग्रेस पक्षात होते, मात्र काही विषयावरुन 2014 साली तौफीक शेख यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. 2014 सालच्या विधानसभा निवडणूकीत प्रणिती शिंदे यांच्या विरोधात तौफीक यांनी निवडणूक देखील लढवली मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत तौफीक यांचा पराभव जरी झाला तरी लढत मात्र फार रंजक झाली. 2017 साली सोलापुर महानगर पालिकेत एमआयएमने पहिल्यांदा निवडणूक लढवली. ज्यात 9 नगरसेवक निवडून देखील आले.

सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत मिळालेल्या यशात तौफीक यांचा प्रमुख वाटा होता. मात्र मे 2019 मध्ये विजयपूर येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेख यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणी त्यांना अटक देखील झाली. तौफीक यांच्या नंतर सोलापूर शहर आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून फारुख शाब्दी यांची निवड कऱण्यात आली. यामुळे तौफीक यांना पक्षातर्फे डावलण्यात आलं. काही दिवसांपूर्वी तौफीक यांना जामीन मंजूर झाल्याने ते तुरुंगातून सुटले आहेत. मात्र “आपल्यावर खोटे गुन्हे दाखल असताना पक्षाने आपल्याला साथ न दिल्याने आपण नाराज आहोत. त्यामुळे समर्थकांच्या मनात पक्षांतराचा विचार सुरु असल्याची” भावना तौफीक शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान सोमवारी तौफीक शेख यांनी सोलापूर महानगर पालिकेतील 7 नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार तौफीक यांच्या प्रवेशासाठी ग्रीन सीग्नल मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र तौफीक यांनी या विषयावर बोलणं टाळलं. “महानगरपालिकेच्या निधी संदर्भात पवार साहेबांची भेट घेतली. तिथे प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. एमआयएममधून बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. येणाऱ्या काही दिवसात निर्णय घेतला जाईल” अशी माहिती तौफीक शेख यांनी दिली. तर दुसरीकडे तौफीक यांच्या विरोधी गटाने तौफीक यांच्यावर असलेल्या अनेक गुन्ह्यांची तसेच हत्येच्या आरोपाची माहिती देखील शरद पवार यांना पत्राद्वारे कळवल्याची माहिती मिळतेय. तौफीक यांना पक्षात प्रवेश दिल्यास पक्षाची प्रतिमा मलीन होईल. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये अशा आशयाचे पत्र तौफीक शेख यांच्या विरोधी गटाने लिहिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तौफीक शेख यांनी इतर 6 नगरसेवकांसहित राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास सोलापूर महानगरपालिकेत मोठा राजकीय भूकंप निर्माण होईल.

शिवसेना नेते महेश कोठे हे देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा

सोलापुरातील शिवसेनेचे नेते महेश कोठे हे देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या सोलापुरात रंगत आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी कोठे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र कोठे हे शिवसेनेतच राहिले, आता पुन्हा त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा जोरात सुरु असल्याने एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क केला. यावेळी “माझे पुतणे नगरसेवक देवेंद्र कोठे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मी सध्या क्वॉरन्टाईन आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही ठिकाणी वाचण्यात आल्या. मात्र ह्या केवळ अफवा आहेत. या आधी मी भाजपमध्ये जाणार असल्याचे चर्चा रंगवल्याने माझे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले. तिकीट कापल्याने आपण पक्षाबद्दल नाराजगी आहे, मात्र मी राष्ट्रवादीत जाणार असल्याचा चर्चा ह्या राजकीय षडय़ंत्राने सुरु आहेत. मी शरद पवारांची भेट घेतल्याची ही चर्चा आहे, मात्र मी अशी कोणतीही भेट घेतलेली नाही” अशी प्रतिक्रिया महेश कोठे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *