सोशल मीडियावर वायरल होतोय सह्याद्रीचा अनोखा अवतार

पुणे: सध्या सोशल मिडीयावर एक इमेज अतिशय वेगाने पसरत आहे. या इमेजमध्ये आहे एका पेजचा मास्क परिधान केलेला लोगो आणि खाली लिहिला आहे एक संदेश – “सह्याद्रीत कोरोनाच्या संक्रमणाचे कारण मी बनणार नाही, परिस्थिती पूर्ववत झाल्याशिवाय मी ट्रेकला जाणार नाही.”
 ‘महाराष्ट्र ट्रेकिंग मिम्स’ या ट्रेकिंग विश्वातील प्रसिद्ध मिमपेजचा हा लोगो असून मिम्सच्या माध्यमातून विविध प्रकारे ते ट्रेकिंग विश्वाला सामाजिक संदेश वेळोवेळी देत असतात. यावेळेस त्यांच्या टीमने आपल्या लोगोला मास्क परिधान करून कोरोनाचे संकट पूर्णपणे नियंत्रणात आल्याशिवाय आम्ही ट्रेकिंग करणार नाही ही घोषणा केली आणि बघता बघता हजारो लोकांनी त्यांचा हा संदेश व्हायरल करून त्यांच्या या ऑनलाईन चळवळीला पाठींबा दिला.
जवळपास ३ महिन्यांपासून समस्त ट्रेकर मंडळी घरातच अडकून बसली आहेत. कधी एकदा लॉकडाऊन उघडतं आणि सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये मोकळा श्वास घ्यायला जातोय असं प्रत्येक ट्रेकरला वाटणं साहजिक आहे. पण अजूनही धोका टळलेला नाही आणि ही गोष्ट ओळखून आणखी काही महिने सह्याद्रीचा विरह सहन करणेच उचित ठरेल असे महाराष्ट्र ट्रेकिंग मिम्सचे म्हणणे आहे.
नुकतीच महाराष्ट्र सरकारने अनलॉक १ ची घोषणा करून अनेक निर्बंध उठवले त्यामुळे अनेकांना असे वाटते आहे कि आपण कुठेही जाऊ शकतो, फिरू शकतो, ट्रेकिंग करू शकतो. अनेकांनी तोच विचार करून गडकिल्ल्यांना भेटी देणे सुरु सुद्धा केले आहे. त्याचे फोटोज सुद्धा सोशल मिडीयावर अपलोड होत आहेत. पण सरकारी नियमांनुसार अजूनही भटकंतीला परवानगी नाही. अशा काही अतिउत्साही ट्रेकर्समुळे ट्रेकिंगला परवानगी मिळाली असा गैरसमज पसरू शकतो आणि लोंढेच्या लोंढे नकळत सह्याद्रीमध्ये कोरोना संक्रमणाचे कारण ठरू शकतात. सध्या मुंबई, पुणे, नाशिक यांसारखी शहरे ही कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनली आहेत. या दोन शहरात हजारोंच्या संख्येने ट्रेकर्स कम्युनिटी आहे. दर वर्षी पावसात तर या ट्रेकर्सच्या गर्दीने सह्याद्री अक्षरशः गजबजून जातो. पण हा पावसाळा वेगळा आहे. या पावसाळ्यात कोरोना नामक संकट विळखा घालण्यासाठी दबा धरून बसलेले असताना, ट्रेकिंगला जाणे म्हणजे आपण स्वत: सह्याद्रीला कोरोनाच्या जबड्यात ढकलण्यासारखे आहे. सह्याद्रीचे अनेक भाग अति दुर्गम आहेत जेथे साध्या वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध नाहीत तिथे थोडे जरी कोरोना संक्रमण झाले तर हाहाकार उडू शकतो. कितीही सुरक्षा घेतली तरी ती या काळात अपूर्ण आहे. त्यामुळे जे कोणी व्यावसायिक ट्रेकिंग ग्रुप्स आहेत त्यांनी सुद्धा या वर्षी थोडे सामाजिक भान बाळगून आपले इव्हेंट्स रद्द करावेत. अशी विनंती सुद्धा महाराष्ट्र ट्रेकिंग मिम्सतर्फे करण्यात आली आहे.

केवळ एक मिम पेज म्हणून न राहता, सध्या गरज असताना आपल्या सामाजिक संवेदनशीलतेला साद देऊन महाराष्ट्र ट्रेकिंग मिम्स ने दिलेल्या या संदेशाचे सोशल मीडियातून चहूबाजूंनी कौतुक होत आहे. ट्रेकर्स मंडळींचा त्यांना मिळणारा महाप्रचंड पाठींबा पाहता आपले ट्रेकिंग विश्व केवळ स्वच्छंदी नाही तर सुजाणही असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: A unique image of Sahyadri is going viral on social media

Leave a Reply

Your email address will not be published.