13 November In History : रवींद्रनाथ टागोर यांना ‘गीतांजली’ काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार जाहीर, माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचा जन्म; आज इतिहासात

मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांची जयंती आहे. तर आजच्याच दिवशी : रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते.  13 नोव्हेंबर 1917 साली सांगली जिल्ह्यातील पद्माळे या छोट्या गावी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक निर्णायक वळण देणारे सहकारमहर्षी म्हणून वसंतदादा पाटील यांना ओळखले जाते. यासोबतच 13 नोव्हेंबर रोजी अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्याची इतिहासात नोंद आहे. या दिवशी कोलंबियामध्ये एक दुःखद घटना घडली. 13 नोव्हेंबर 1985 रोजी कोलंबियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यात तब्बल 23,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. याबोरबरच आजच्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबर 2015 रोजी दहशतवाद्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी मोठे हल्ले केले. या हल्ल्यात जवळपास 130 लोक मारले गेले आणि 350 हून अधिक जखमी झाले होते. सर्वात प्राणघातक हल्ला Bataclan थिएटर आणि कॉन्सर्ट हॉल येथे झाला. येथे दहशतवाद्यांनी  100 हून अधिक लोकांवर गोळीबार केला. येथे 80 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय दोन रेस्टॉरंट आणि एका स्टेडियमलाही लक्ष्य करण्यात आले. यावेळी गोळीबारासह स्फोटही झाले. अभिनेत्री जुही चावलाचा जन्म 13 नोव्हेंबर 1967 रोजी झाला. जुही चावला 1984 ची मिस इंडिया विजेती आहे. जुहीने हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. 

1780 : पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांचा जन्म  

महाराजा रणजीत सिंह हे शीख साम्राज्याचे राजा होते. ते शेर-ए पंजाबच्या नावाने खुप प्रसिद्ध आहेत. ते एक असे व्यक्ती होते ज्यांनी आपल्या पंजाब राज्याला सशक्त तर बनवलेच त्यासोबतच ते जिवंत असेपर्यंत त्यांनी इंग्रजांना आपल्या राज्याच्या जवळपास फिरकूही दिले नाही. रणजीत सिंह यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1780 रोजी गुंजारवाला येथे झाला होता. त्यांचे वडील महासिंह सुकरचकिया साम्राज्याचे सरदार होते. रणजीत सिंह हे घोड्याची स्वारी करणे, तलवार चालवणे तसेच युद्ध करण्याच्या विद्येमध्ये निपुण होते. 11 वर्षाचे असतानाच त्यांनी आपल्या वडिलांबरोबर युद्ध मोहिमेवर जाण्यास सुरुवात केली होती. 13 वर्षाचे असताना पहिल्यांदा त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हशमत खा याने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रणजीत सिंहानी आपला बचाव करताना त्यालाच ठार केले. 

1913 : रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार जाहीर

रवींद्रनाथ टागोर हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते.19 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन “अगदी संवेदनशील, ताजे आणि सुंदर” कविता असे केले जाते. ते 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक आणि पारंपारिक म्हणून पाहिले गेले; तथापि, त्यांचे “सुंदर गद्य आणि जादुई कविता” बंगालबाहेर फारसे ज्ञात नाहीत.

1917 : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांची जयंती 

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांची जयंती आहे. 13 नोव्हेंबर 1917 साली सांगली जिल्ह्यातील पद्माळे या छोट्या गावी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक निर्णायक वळण देणारे सहकारमहर्षी म्हणून वसंतदादा पाटील यांना ओळखले जाते. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते आणि प्रभावी मुख्यमंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात राज्यासाठी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांच्या कामामुळं आजही जनमाणसात त्यांचे स्थान कायम आहे. वसंतदादा यांनी 1977  ते 1985 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. 1977 ला ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एका वर्षांनी त्यांचे सरकार पडून शरद पवार यांच्या नेतृत्वात पुलोदचे सरकार स्थापन करण्यात आलं. त्यानंतर 1983 ला वसंतदादा पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. वसंतदादा काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते.  राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली.  

 1918 : ऑस्ट्रिया हे प्रजासत्ताक बनले 

 17 व्या  आणि 18 व्या शतकांदरम्यान ऑस्ट्रिया युरोपातील सर्वात बलाढ्य राष्ट्रांपैकी एक राष्ट्र होते.  1804 ला फ्रान्समध्ये झालेल्या नेपोलियनच्या राज्याभिषेकाला शह देण्यासाठी ऑस्ट्रियन साम्राज्यची स्थापना करण्यात आली. याचवेळी जर्मनीमध्ये प्रशियाचे राजतंत्र देखील बलशाली बनले होते. जर्मन-भाषिक राष्ट्रांवरील वर्चस्वासाठी 1866 साली ऑस्ट्रो-प्रशियन युद्ध झाले. या युद्धात प्रशियाचा विजय झाला. 1867 साली ऑस्ट्रिया व हंगेरीचे राजतंत्र यांनी ऑस्ट्रिया-हंगेरी या एकत्रित राष्ट्राची निर्मिती केली. त्या नंतरच्या काळात जर्मन साम्राज्यासोबत ऑस्ट्रियाचे सौदार्हाचे संबंध बनले.  1910 च्या पूर्वार्धातील अत्यंत तणावपूर्ण वातावरणादरम्यानच 1914 साली बोस्निया स्निया आणि हर्जगोव्हिनाची राजधानी सारायेव्हो येथे ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड यांची हत्या केली गेली. त्यामुळे खवळून उठलेल्या ऑस्ट्रियाने जर्मन साम्राज्याच्या चिथावणीखाली येऊन सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले ज्याचे रूपांतर झपाट्याने पहिल्या महायुद्धात झाले. 1918 मधील पराभवानंतर पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक निर्माण करण्यात आले. 

1971 : अमेरिकेचे अंतराळयान मारियार-9 ने मंगळ ग्रहाभोवती प्रदिक्षिणा घातली

अमेरिकेचे अंतराळयान मारियार-9 ने मंगळ ग्रहाभोवती प्रदक्षिणा. पृथ्वीवरून पाठवलेले अंतराळयान दुसऱ्या ग्रहाभोवती फिरण्याची ही पहिलीच वेळ होती. सुमारे महिनाभरानंतर शास्त्रज्ञांना मंगळाची स्पष्ट छायाचित्रे दिसली. 30 मे 1971 रोजी नासाने मंगळावरील पहिले मानवरहित अंतराळयान मरिनर-9 अवकाशात पाठवले होते.  13 नोव्हेंबर 1971 रोजी मरिनर-9 ने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आणि त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. मरिनर 9 वरील कॅमेऱ्यांनी मंगळाची 7,329 छायाचित्रे घेतली. 27 ऑक्टोबर 1972 रोजी या विमानाचा संपर्क तुटला होता. यानंतर  सोव्हिएत विमान मार्स-2 मंगळावर परतले, परंतु 20 सेकंदांनंतर ते खराब झाले.  

1967 :  अभिनेत्री जुही चावलाचा जन्म

अभिनेत्री जुही चावलाचा जन्म जन्म 13 नोव्हेंबर 1967 रोजी झाला. जुही चावला 1984 ची मिस इंडिया विजेती आहे. जुहीने हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. याशिवाय तिने बंगाली, पंजाबी, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलगू भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. 1980 च्या उत्तरार्धात आणि 1990 च्या सुरुवातीच्या काळात ती सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणार्‍या हिंदी चित्रपट अभिनेत्रींपैकी एक होती. जुहीला दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

1985 : कोलंबियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकात 23,000 हून अधिक लोकांचा मृत्यू  

कोलंबियामध्ये 13 नोव्हेंबर 1985 रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यात तब्बल 23,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. पश्चिम कोलंबियामधील नेवाडो डेल रुईझ हे पॅसिफिक बेसिनच्या आसपास असलेल्या रिंग ऑफ फायरवरील अनेक ज्वालामुखींपैकी एक आहे. हा प्रदेश सक्रिय ज्वालामुखी आणि वारंवार भूकंपासाठी प्रसिद्ध आहे. 1985 च्या उत्तरार्धात अनेक दशके सुप्त पडून राहिल्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक होऊ लागला आणि त्यानंतर त्याच वर्षी 13 नोव्हेंबर रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून इतकी उष्णता उत्सर्जित झाली की त्याने पर्वतावर कायमस्वरूपी झाकलेला सर्व बर्फ वितळला. यात 23,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 

 1997: सुरक्षा परिषदेने इराकवर प्रवास निर्बंध लादले  

आजच्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबर 1997 रोजी सुरक्षा परिषदेने इराकवर प्रवास निर्बंध लादले.  

1998 : तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा आणि अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट

तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा आणि अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट झाली. चीनचा प्रचंड विरोध असतानाही ही बैठक ठरल्याप्रमाणे पार पडली. या भेटीचा दिवस 13 नोव्हेंबर 1998 या दिवशी होता. 

 2015 : पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्यात 130 ठार

2015 मध्ये 13 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी मोठे हल्ले केले. या हल्ल्यात जवळपास 130 लोक मारले गेले आणि 350 हून अधिक जखमी झाले होते. सर्वात प्राणघातक हल्ला Bataclan थिएटर आणि कॉन्सर्ट हॉल येथे झाला. येथे दहशतवाद्यांनी  100 हून अधिक लोकांवर गोळीबार केला. येथे 80 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय दोन रेस्टॉरंट आणि एका स्टेडियमलाही लक्ष्य करण्यात आले. यावेळी गोळीबारासह स्फोटही झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *