16 November In History : ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचा जन्म, सचिन तेंडुलकरचा क्रिकेटला अलविदा; आज इतिहासात…

16 November In History :  इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. जगाच्या आणि देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने 16 नोव्हेंबर हा दिवस अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी युनेस्कोची स्थापना झाली होती. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू आणि बॅडमिंटनपटू पुलेल्ला गोपीचंद  यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला आहे. जगभरात आजचा दिवस सहनशीलता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

 
आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिवस (International Day for Tolerance) 

16 नोव्हेंबर हा जगभरात सहनशीलता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. असहनशीलतेचा अंत व्हावा या उद्देशाने ‘युनेस्को’ने 16 नोव्हेंबर 1995 रोजी सहनशीलता दिवसाची घोषणा केली. यूएनमध्ये 51/ 95 हा ठराव मंजूर झाला अन् 16 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन म्हणून घोषीत केलं. मानवी मूलभूत हक्कांची जोपासना व्हावी, त्याशिवाय मानवतेची अस्मिता जपताना, मानवी मूल्यामुळे पुढच्या पिढीला युद्धाच्या अरिष्टापासून वाचविण्यासाठी या दिवसाची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय या दिवसाचे उद्दीष्ट संस्कृती आणि लोक यांच्यात परस्पर समज वाढवून सहिष्णुता वाढविणे हे आहे.  
 

1945 : UNESCO ची स्थापना

जवळपास 76 वर्षापूर्वी 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडनमध्ये युनेस्कोची (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटन-UNESCO)स्थापना झाली होती. भारत, युएस, चीन, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह 193 देश या संघटनेचे सदस्य आहेत. तर जगभरात याची 50 पेक्षा अधिक कार्यालये आहेत.  युनेस्कोचं मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. युनेस्को हे संयुक्त राष्ट्रांचं एक अंग आहे. यामार्फत जगभरातील विकसनशील राष्ट्रांमध्ये शिक्षण, विज्ञान, सांस्कृतिक यासारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये काम केले जातं. ऐतिहासिक, सांस्कृतीक, नैसर्गिक स्थळांना युनेस्कोकडून जागतिक वारसा हा दर्जा दिला जातो. 

1927 : श्रीराम लागू यांचा जन्म : 

हिंदी आणि मराठी चित्रपट, रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचा आज जन्मदिन. 16 नोव्हेंबर 1927 रोजी साताऱ्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती, त्यांचं शिक्षण पुण्या-मुंबईत झालं.  श्रीराम लागू यांनी अभ्यासासाठी मेडिकलची निवड केली. वैद्यकीय व्यवसायामुळे ते आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये गेले. पण सर्जन म्हणून काम करत असतानाही त्यांची अभिनयाची आवड जोपासत राहिले. दोन दशकांहून अधिक काळ औषधोपचारात घालवल्यानंतर, श्रीराम लागू यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अभिनयाला आपला व्यवसाय बनवला. 1969 मध्ये ते पूर्णपणे मराठी रंगभूमीवर आले. नटसम्राट, हिमालयाची सावली, किरवंत क्षितीजापासून समुद्र यासारखी नाटकामध्ये प्रभावी भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवली.  सिंहासन, पिंजरा, मुक्ता यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. लागू यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

1893 : डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन

आजच्याच दिवशी 1893 मध्ये डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचं भारतात आगमन झालं होतं. अॅनी बेझंट यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली. इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी 1914 मध्ये होमरुल चळवळ सुरु केली. 1917 सालच्या कोलकातामध्ये (तेव्हाचं कलकत्ता) झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अॅनी बेझंट पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. बनारस हिंदु विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्याशिवाय थिऑसॉफीकल सोसायटीची मद्रासमध्ये स्थापना केली होती. 

1988 : बेनिझिर भुट्टो यांनी निवडणूक जिंकली 

पाकिस्तानीच्या माजी पंतप्रधान  बेनिझिर भुट्टो यांनी 1988 मध्ये आजच्याच दिवशी निवडणूक जिंकली होती. तब्बल 11 वर्षानंतर झालेली सार्वत्रिक निवडणूक जिंकून भुट्टो पंतप्रधान झाल्या होत्या. त्या पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांना सातत्याने ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. 27 डिसेंबर 2007 रोजी, रावळपिंडीत एका रॅलीमध्ये असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये भुट्टो यांचा मृत्यू झाला. बेनिझिर भुट्टो यांचे पती म्हणजे असिफ अली झरदारी यांनी भुट्टो यांचे शव विच्छेदन करु दिलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या हत्येचं गुढ कायम राहिलं आणि हल्लेखाराला शेवटपर्यंत पकडता आलं नाही. 

1973 : बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म 

16 नोव्हेंबर 1973 मध्ये पुलेला गोपीचंद यांचा नगंदला येथे जन्म झाला.
गोपीचंदने 2001 साली बॅडमिंटनविश्वातली प्रतिष्ठेची ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर शीतपेयांच्या जाहिराती करण्यास नकार देऊन त्यानं देशवासियांची मनं जिंकली होती. त्याआधी 1998 साली गोपीचंद यांनी क्वालालुंपूरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांघिक रौप्य आणि पुरुष एकेरीचं कांस्यपदक मिळवलं होतं. दुखापतींमुळं त्यांची कारकीर्द आणखी बहरू शकली नाही. खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यावर तो प्रशिक्षणाकडे वळले. अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या गोपीचंद यांनी सायना आणि सिंधूशिवाय किदम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यप, गुरुसाईदत्त अशी बॅडमिंटनची अख्खी पिढी घडवण्यात महत्त्वाचं योगदान दिलंय.

2013 : सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधून निवृत्ती

24 वर्षांच्या प्रदीर्घ करिअरनंतर क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरनं निवृत्तीची घोषणा केली. 16 नोव्हेंबर 2013 रोजी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटले अलविदा केला होता.  क्रिकेटमधून निवृती घेतल्यानंतरसचिनला ’भारतरत्‍न’ हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *