17 February In History : क्रांतिकारी लहुजी वस्ताद आणि वासुदेव बळवंत फडकेंची पुण्यतिथी, इतिहासात आज

मुंबई: फेब्रुवारी महिन्यातील 17 तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी क्रांतिकारी लहुजी वस्ताद यांची पुण्यतिथी आहे. तर 17 फेब्रुवारी हा लढाऊ राष्ट्रवादाचे जनक म्हणून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या देखील पुण्यतिथीचा दिवस आहे. याशिवाय आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. 

1600 – जिओर्डानो ब्रुनो यांचं निधन –
 
जिओर्डानो ब्रुनो यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत त्यांनी मांडले होते. आजच्याच दिवशी 1600 मध्ये जिओर्डानो ब्रुनो यांना बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले होते. 

1782 – बुधु भगत यांचा जन्म 

स्वातंत्र्य सैनिक बुधु भगत यांचा जन्म झाला होता. 17 फेब्रुवारी रोजी झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातल्या सिलगाई येथे बुधु भगत यांचा जन्म झाला होता. इंग्रजांनी आदिवासी जनतेचे जमिनीचे हक्क काढून जमीनदारांना देण्याचे षडयंत्र रचले होते. या अन्यायाविरोधात बुधू भगत यांनी इंग्रजांविरोधात सशस्त्र संग्राम उभारला.

1801 : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सारखीच मते 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष केलं.  तर बर यांना उपाध्यक्ष केले

1874 थॉमस वॉटसन ( Thomas John Watson) 

अमेरिकेतील उद्योगपती थॉमस वॉटसन यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. थॉमस यांनी उमेरिकेतील उद्योगाला नवी दिशा दिली. थॉमस वॉटसन यांनी आय. बी. एम. (IBM) या कंपनीची स्थापना केली होती. त्यांचा मृत्यू 19 जून 1956 रोजी झाला होता. 

1881 क्रांतिकारी लहुजी वस्ताद यांची पुण्यतिथी –

क्रांतिकारक लहुजी वस्ताद यांचं आजच्याच दिवशी 1881 मध्ये निधन झालं होतं. लहुजी साळवे यांचे पूर्णनाव लहु राघोजी साळवे असे होते .त्यांचा जन्म पुरंदर किल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला.  मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहुजी दांडपट्टा, घोडेस्वारी, भालाफेक, मंडूक, तोफागोळा चालवयात पारंगत हाते. त्यांना आरक्रांतीचौर, क्रांतीगुरू, लहुजीबुवा,मांग या नावानेही ओळखले जातात.

1883 – वासुदेव बळवंत फडकेंची पुण्यतिथी  (vasudev balwant phadke )-

17 फेब्रुवारी हा लढाऊ राष्ट्रवादाचे जनक म्हणून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीचा दिवस. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आजच्याच दिवशी 1883 मध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे निधन झाले होते. राजकीय भूमिका घेत त्यांनी इंग्रजांविरुधात सशस्त्र उठाव केला होता. एडन येथे ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे झाला होता.  त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

1954 : के.चंद्रशेखर राव जन्मदिन (K. Chandrashekar Rao)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. त्यांनी नुकतेच  राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असे आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी फेडरल फ्रंट नावाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *