Breaking News LIVE: दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा, वाचा एका क्लिकवर!

18 फेब्रुवारी रोजी देशभरात रेलरोको
तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमांवर जवळपास 80 दिवसांपासून शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) 18 फेब्रुवारी रोजी देशभरात रेलरोको अभियान राबवण्याची घोषणा केली. संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं की, ”18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून चार वाजेपर्यंत संपूर्ण देशभरात रेलरोको अभियान राबवलं जाईल. तसंच 12 फेब्रुवारीपासून राजस्थानचे सर्व टोलनाके मोफत करणार असल्याचंही संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं.
आठ महिन्याच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड
विरार पोलिसांनी एका 8 महिन्याच्या मुलीला 2 लाखांत विकण्यासाठी आलेल्या चार आरोपींना अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली आहे. यात दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. यातील एक इसम हा डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीच आहे. या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या चौघांना 16 फेब्रुवारी पर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
समुद्रात आलेल्या शक्तिशाली भूकंपानं हादरलं न्यूझीलंड
गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये सातत्यानं भूकंपाचे हादरे जाणवले. आता न्यूझीलंडसमवेत तीन राष्ट्रांमध्ये समुद्रात आलेल्या भूकंपामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पॅसिफिक महासागराच्या दक्षिण भागात बुधवारी भूकंपाचे जबर धक्के जाणवले. न्यूझीलंडसह वानुअतू, न्यू कॅलेडोनिया या भागांनाही भूकंपानं हादरा दिला. बुधवारी सायंकाळच्या सुमारास न्यूझीलंडच्या उत्तर भागात भूकंपाचे जबर हाजरे जाणवले. येथील बहुतांश भागांमध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र संस्थेच्या माहितीनुसार लॉयल्टी आयलंडपासून दक्षिण पूर्वेकडे 10 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता 7.7 रिक्टर स्केल इतकी होती.