Crime: मटण सूपमध्ये भात आला म्हणून ग्राहक संतापला अन् 19 वर्षाच्या वेटरलाच संपवलं… पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Pimpari Chinchwad Crime:  पिंपरी चिंचवडमध्ये एक (Pimpari Chinchwad Police) धक्कादायक घटना घडली आहे. मटणाच्या सूपमध्ये भात आल्याने दोघांनी वेटरची हत्या केली आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. पिंपळे सौदागर येथील सासुरवाडी हॉटेलमध्ये ही घटना काल रात्री घडली. मंगेश पोस्ते असं 19 वर्षीय मयत वेटरचं नाव होतं. तर अजित मुटकुळे आणि सचिन भवर अशी जखमींची नावं आहेत. विजय वाघेरे आणि त्याच्या साथीदाराने या तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. त्याच आधारे सांगवी पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत.

मंगळवारी रात्री पिंपळे सौदागर येथील सासुरवाडी हॉटेलमध्ये विजय वाघेरे आणि त्याचे साथीदार जेवायला आले होते. आल्यापासून त्या दोघांची किरकिर सुरू होती. जेवण आणि सर्व्हिस चांगली नाही, अशी ओरड ते करतच होते. अशातच मटण सूपमध्ये चुकून भात आला. त्यानंतर विजय आणि साथीदार चांगलेच चवताळले. 

विजयने वेटर मंगेशसह अजित आणि सचिनला शिविगाळ आणि दमदाटी सुरू केली. तर तेव्हाच विजयच्या साथीदाराने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने या तिघांना मारहाण सुरू केली. त्यांचा जास्त राग हा मंगेशवर होता, म्हणूनच मंगेशला उद्देशून त्यांनी अपशब्द काढले. तुला मस्ती आलीय, तर आज तुला संपवतो, असं ओरडत त्याने मंगेशच्या थेट डोक्यातच दांडक्याने प्रहार केला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला. या हल्ल्यात मंगेश गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी मंगेशला लगतच्याच खाजगी रुग्णालयात त्याला दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर अजित आणि सचिनवर उपचार सुरू आहेत. सांगवी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी विजय आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Reels

दरम्यान या घटनेनं पिंपरी चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत असून आरोपींचा शोध सुरु आहे. पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढताच दिसून येत आहे. क्षुल्लक कारणांवरुन एकमेकांचे जीव घेण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. 

ही बातमी देखील वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *