Cyclone Gulab : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार, पुढील सहा तासात चक्रीवादळात रुपांतर

मुंबई : बंगालच्या उपसागरातील अतीतीव्र कमी दाबाचे  पुढील सहा तासात चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर ‘गुलाब’ असं ह्या चक्रीवादळाचं नाव असून पाकिस्तानकडून हे नाव देण्यात आले आहे. दक्षिण उडीशा – उत्तर आंध्र प्रदेश दरम्यानच्या कलिंगपट्टणमजवळ किनारपट्टीला 26 सप्टेंबरला संध्याकाळी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेले क्षेत्र महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे.  महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीमुळे रविवारपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. 

महाराष्ट्राला याचा फटका बसणार नसला तरी प्रभाव मात्र नक्कीच

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात या चक्रीवादळाचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होणार आहे अशातच महाराष्ट्राला याचा फटका बसणार नसला तरी प्रभाव मात्र नक्कीच जाणवणार आहे. 

बंगालच्या उपसागरात 2021 मध्ये निर्माण होणारे हे तिसरे चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात 2021 मध्ये निर्माण होणारे हे तिसरे चक्रीवादळ असेल. ह्याआधी तौक्ते, यास चक्रीवादळं आली होती. दरम्यान, 2011 ते 2021 सालात सप्टेंबर महिन्यात निर्माण होणारं हे तिसरं चक्रीवादळ आहे. तर 1990  ते 2021  सालात सप्टेंबर महिन्यात 14 चक्रीवादळं निर्माण झाली आहेत आणि हे गुलाब  15 वे चक्रीवादळ   असणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.