Flower Farmers : पावसामुळं अहमदनगर जिल्ह्यातील फुल शेतीचं नुकसान, सणासुदीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना फटका

Flower Farmers : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झालं आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळं फुल शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे बाजारात फुलांची आवक देखील घटली आहे. दसरा दिवाळीत झेंडूसह इतरही फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र, फुलांचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात आहेत.

फुलांच्या उत्पादनात मोठी घट

पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झाले आहे. पण बाजारात यंदा फुलांची आवक कमी असल्याने ग्राहकांच्याही खिशाला कात्री लगणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा, अकोळनेर, वासुंदे, खडकवाडी या भागातील फुल शेतीला प्रामुख्याने फटका बसला आहे. ऐन तोडीच्या हंगामातच पावसामुळं फुलांवर करपा पडला आहे. त्यामुळं उत्पादनात घट झाली आहे. झेंडू झाडाची पाने खराब होण्यासह फुलांवर काळे डाग पडले आहेत. पावसाच्या थेंबांमुळे फुले काळवंडली देखील आहेत. फुलांमध्ये पाणी गेल्याने ती आतून सडली आहेत. 

फुलांची आवक घटल्यानं दरांमध्ये वाढ

दरम्यान, सध्या नगरच्या मार्केटमध्ये फुलांची आवक घटल्यानं दर वाढले आहेत. सध्या शेवंतीला 200 रुपये, भाग्यश्री शेवंती 150 रुपये, अष्टरला 160 ते 200, झेंडू 60 ते 80 रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहेत. सध्या 30 ते 40 टक्के आवक कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. 

पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुल शेती 

सध्या अहमदनगर जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळं फुलांचे मोठे नुकसान झालं आहे. पावसामुळं फुलांची गळती झाली आहे. निम्म्यानेच उत्पन्नात घट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मागील वर्षी झेंडूला बाजार कमी होता. यावर्षी पावसामुळं माल खराब झाला आहे. त्यामुळं आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. दर वाढले असून, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी चांगला माल उपलब्ध नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक असल्याने पारनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फुल शेती करतात. मात्र, यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे खर्च वजा जाता 10 ते 15 हजार रुपये एकरी शिल्लक राहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पारनेर तालुक्यात भाग्यश्री शेवंती, पेपर व्हाईट शेवंती, पौर्णिमा, अष्टर आणि झेंडूचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. मात्र, दोन ते तीन वेळा तोडणी झाल्यानंतर पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *