Kolhapur Crime : शिरोळ तालुक्यातील वृद्धाचा लेकीकडे जाताना एसटीमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; आरोग्य केंद्रात एसटी नेऊनही जीव वाचवण्यात अपयश 

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील वृद्धाचा एसटीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. फक्रुद्दीन अब्दुल मुजावर (वय 79, रा. उदगाव, ता. शिरोळ जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. लेकीकडे जात असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

फक्रुदीन मुजावर यांच्या तोंडाला फेस येत असल्याचे दिसताच वाहकाने चालकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर एसटी तातडीने हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आली. तथापि, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चालक विलास पाटील आणि महिला वाहक यु.आर. सडोले हे 40 प्रवाशांसह सांगलीहून कोल्हापूरकडे येत होते. 

सांगलीहून कोल्हापूरला येत असलेली कोल्हापूर डेपोची एसटीमध्ये (MH-14-BT-2861) शिरोळ तालुक्यातील उदगाव येथून फक्रुद्दीन  मुजावर यांना त्यांच्या मुलाने जयसिंगपूरमधून एसटीमध्ये बसवले. मुजावर हे कोल्हापूरला आपल्या मुलीकडे निघाले होते. हातकणंगले तालुक्यातील चोकाकजवळ एसटी आली असतानाच मुजावर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तोंडाला फेस येऊ लागल्याने महिला वाहक यु. आर. सडोल यांनी चालक विलास  पाटील यांना तत्काळ माहिती दिली.

त्यामुळे प्रसंगावधान राखून चालक पाटील यांनी एसटी थेट हेरल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी मुजावर मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांसह कोल्हापूर डेपोमध्ये देण्यात आली. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये मुजावर यांचे नातेवाईक वाट पाहत थांबले होते. बस वेळेत न पोहोचल्याने त्यांनी डेपोत चौकशी केल्यानंतर त्यांना ही धक्कादायक माहिती समजली. त्यानंतर नातेवाईक हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रवाना झाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *