Maharashtra News Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदल केलेला नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. त्याचसंदर्भात विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाणार आहे. तसेच राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. यासह आज दिवसभरात इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या पाहूयात,

MPSC विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार
MPSC च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज  संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेटणार आहे. MPSC च्या परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा यासाठी पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग लेखी स्वरुपात निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतलाय. मंगळवारी रात्री शरद पवारांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक घेण्यास पुढाकार घेऊ असे म्हटले होते. त्यानुसार शरद पवार यांच्यासह पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.  

सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस 
मागच्या दोन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. आज या सुनावणीचा तिसरा दिवस आहे. काल झालेल्या दुसऱ्या दिवशीदेखील ठाकरे गटांकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सिब्बल यांनी राजकीय पक्ष-विधीमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद, पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तिवाद केला.

किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर
भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात मोर्चा उघडलेल्या किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील घरी ईडीने धाड टाकली होती. आजचा सोमय्यांचा दौरा त्या संदर्भातच आहे का याचं उत्तर काही तासांमध्ये मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *