Maharashtra News Updates 27 February 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तर, जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ईशान्य भारतातील नागालँड आणि मेघालय राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीति या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.  25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प आहे.

नागालँड आणि मेघालयात मतदान 

नागालॅंड आणि मेघालाय या दोन राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यात विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. मात्र दोन्ही राज्यात 59 – 59 जागी मतदान होणार आहे. नागालॅंडमध्ये विरोधकाने नाव मागे घेतल्याने भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. तर मेघालयात सोहियोंग विधानसभेसाठी युनाइटेड डेमोक्रेटिक पार्टी (यूडीपी) चा उमेदवार एच. डोनकुपर रॉय लिंगदोह यांचा मृत्यू झाल्याने तिथे मतदान होणार नाही.

जागतिक मराठी भाषा दिवस

– जागतिक मराठी भाषा दिवसनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

– ठाकरे गटाकडून जागर मराठी भाषेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने कार्यक्रम पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.

– नवी मुंबई मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत असणार आहे.
 
– मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीचे आयोजन

– नाशिक- मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी. नाशिक मनपा, सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन साजरा करणार. कार्यक्रमाला 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे उपस्थित राहणार आहेत. 
 

मुंबई 

– पोलीस भरतीप्रमाणे महापारेषण कंपनीमध्ये तृतीयपंथीयांना नोकरीत आरक्षण देण्याच्या मागणीवर हायकोर्टात आज सुनावणी

– मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

– मुंबई सत्र न्यायालयात पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे. या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि प्रवीण राऊत देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर 

जी 20 परिषद आज आणि उद्या असणार आहे. 

वेगवेगळ्या देशातील 150 महिला सदस्यांची दोन दिवस परिषद आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भागवत कराड, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत

 अमरावती

नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होणार आहे. 

धुळे

शिवगर्जना संवाद दौऱ्याला माजी खासदार अनंत गीते, वरुण सरदेसाई उपस्थित राहणार. 

पालघर 

वसई  – तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शीझान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी असणार आहे.. तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला खान आता न्यायालयीन कोठडीत आहे. 

कोल्हापूर

धरणग्रस्त नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर आंदोलनात सहभागी होणार आहेत.

वाशिम 

राज्यातील 29 हजार ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन आहे. संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची प्रमुख मागणी आहे

इतर महत्त्वाच्या घडामोडी 

दिल्ली 

मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात ‘आप’ आज दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने करणार आहे.

बेळगाव

पंतप्रधान मोदी बेळगाव दौऱ्यावर आहे. विविध विकासकामांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. राणी कित्तूर चन्नमा चौक ते मालिनी सिटीपर्यंत मोदींचा रोड शो होणार आहे. रोड शो नंतर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा असणार. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *