Maharashtra Rains LIVE : आज राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई, पश्चिम उपनगर आणि ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात

मुंबई : आज राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम उपनगर आणि ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भालाही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतल्या अनेक उपनगरांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे : लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 192 मिलिमीटर पाऊस कोसळला. यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद. आत्तापर्यंत 3290 मिमी पाऊस बरसला. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 5110 मिमी पावसाची नोंद झाली होती.

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी झाली असली तरी काल रात्री पासून पुन्हा एकदा पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. राधानगरी धरणाचे पुन्हा एकदा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून एकूण 4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरु झाला आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 38 फूट 3 इंच इतकी आहे.

बुलढाणा : तालुक्यात गेल्या 7 ते 8 दिवसापासुन सतत मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे बुलढाणा तालुक्यातील सर्वच नद्यांना महापुर आला आहे. त्यातच अंभोडा, हतेडी, तांदुळवाडी या गावातून वाहनाऱ्या नदीला काल आलेल्या पुरामुळे नदी पात्राने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे नदी पात्राचे पाणी नदी काठी असलेल्या शेतांमध्ये शिरून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले मक्का, सोयाबीन, मिरची, उडीद, मुग, भेंडी यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच शेती पूर्ण पणे खरडून गेली त्यामुळे भविष्यातही शेती तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नेहमीच होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी राजा प्रचंड हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुण आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

गडचिरोली : भामरागड  पूरस्थिती आणखी बिकट झाली असून तालुक्यात रात्रभर पाऊसाने दमदार हजेरी लावली. सोबतच  छत्तीसगड मधील अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या अतिवृष्टीने इंद्रावती फुगल्याने भामरागडच्या पर्लकोटा नदी पातळीत धोकादायक वाढ झाली आहे. शंभरहुन अधिक घरे दुकाने पाण्याखाली गेली असून परवा संध्याकाळपासून मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. आलापल्ली- भामरागड मार्गावरील दळणवळण ठप्प झाल्याने भामरागडवासीयांचे मात्र हाल सुरु आहेत. तर जनजीवन विस्कळीत झालं असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *