Nagpur News: नागपूर महामेट्रोची मोठी घोषणा; राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त प्रवासी भाड्यात सवलत

नागपूर: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापनेला अवघा काही अवधी शिल्लक राहिला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले असून देशभर जय्यत तयारी सुरू आहे. या उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. अशातच नागपूर शहरात (Nagpur) देखील अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर  महामेट्रोने (Nagpur Metro) प्रवाशांना तिकिटात 30 टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे शहरात आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास करणे अधिकच सोपे होणार आहे.

नागपूर महामेट्रोच्या तिकिटात 30 टक्के सवलत जाहीर

अयोध्येत श्रीराम मंदिराचे विधिवत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 22 जानेवारीला होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  सोबतच राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून 22 तारखेला शासकीय सुट्टी घोषित केली आहे.  त्यातच आता महामेट्रोने नागपूरकरांना एक आनंददायी बातमी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा उद्या होतो आहे. या शुभदिनी महामेट्रोने प्रवाशांना तिकिटात ३० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे मेट्रो सेवा ठरलेल्या वेळेप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत नेहमीप्रमाणे उपलब्ध असेल. मात्र प्रवाशांना तिकीटात 30 टक्के सवलत मिळाल्याने  या  सवलतीचा फायदा नागपूरकरांना घेता येईल.

शहरात विविध कार्यक्रम 

नागपुरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे 22 जानेवारीला मंदिर परिसर सुमारे दीड लाख दीपज्योतींनी उजळणार आहे. या दीपज्योतीच्या माध्यमातून अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती, रामदरबार, धर्मरक्षक राम यांची आकृती आकारण्यात येणार आहे. अयोध्येच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त साजरा होणारा दीपोत्सव हा नागपूरकरांसाठी नेत्रदीपक ठरणार आहे.

अयोध्येच्या सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण

नागपुरातील बजेरिया महिला समाजातर्फे ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरात  22 जानेवारीला दुपारी 12 वाजेपासून अयोध्येच्या सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण होणार आहे. या सोहळ्यासाठी सभामंडप आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. सध्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 22 जानेवारीला सायंकाळी 6.30 वाजतापासून दीड लाख दीपांचा दीपोत्सव होणार आहे. मंदिराच्या गर्भगृहातही दीपज्योतीच्या प्रकाशात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. मंदिराचा परिसरात दीपज्योतीच्या माध्यमातून विविध आकृती साकारण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *