Nana Patole Letter To CM : दिवाळीसाठी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा करा, नाना पटोले यांची मागणी

Nana Patole Letter To CM : दिवाळीसाठी (Diwali) राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा करावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तूसह किराणा माल घेणं आवाक्याबाहेर आहे, असंही नाना पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) रेशनकार्डधारकांना दिवाळीसाठी रेशनवर 100 रुपयांमध्ये एक किलो चणाडाळ, साखर, रवा आणि एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणं हे सरकारचे कर्तव्यच आहे. परंतु ज्या चार वस्तू आपण देण्याचा निर्णय घेतला आहे, त्या एका कुटुंबासाठी अपुऱ्या आणि अत्यंत तुटपुंज्या आहेत. खरोखरच राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी असं वाटत असेल रेशनकार्डधारक प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यात किमान 3000 रुपये थेट जमा करावेत, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी पत्रात काय लिहिलंय? 
राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी रेशनकार्डधारकांना दिवाळीसाठी रेशनवर 100 रुपयांमध्ये एक किलो चणाडाळ, साखर, रवा आणि एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. परंतु प्रचंड वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूसह किराणा माल घेणं आवाक्याबाहेर आहे, अशा परिस्थितीत ज्या चार वस्तू आपण देण्याचा निर्णय घेतला आहे, त्या एका कुटुंबासाठी अपुऱ्या व अत्यंत तुटपुंज्या आहेत. खरोखरच राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी असे आपणास वाटत असेल तर ही तुटपुंजी मदत कामाची नाही. तेव्हा रेशनकार्डधारक प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यात किमान 3000 रुपये थेट जमा करावेत, अशी आमची मागणी आहे. राज्याचे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री या नात्याने आपण उपरोक्त मागणीचा गांभीर्याने विचार करुन तात्काळ निर्णय घ्यावा ही विनंती.

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती एक किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 486 कोटी 94 लाख खर्चाला देखील मान्यता देण्यात आली. संबंधित  शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *