Nashik Crime : नाशिकमधून अठरा लाखांचा गुटखा पकडला, गोडावून केले सील, अन्न औषध प्रशासनाची कारवाई, 

Nashik Crime : अन्न व औषध प्रशासनाने (Food And Drug Administration) नाशिकराेड भागात दाेन ठिकाणी धाडी टाकत तब्बल 18 लाख रुपयांचा मिक्स गुटखा व सुगंधित तंबाखू, पान मसाला व सिगारेटचा साठा जप्त केला आहे. शहरातील बहुतेक पानटपऱ्यांसह दुकानांवर याच गाेडाउनमधून गुटखा (Gutkha) पुरविला जात हाेता. याबाबत नाशिकराेड पाेलिसांत (Nashik Police) दाेन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिळालेल्या माहितीच्या आधारे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी नाशिक राेडमधील सुभाष राेडवरील सचदेव आर्केड या ठिकाणी असलेल्या गोदामावर छापा टाकला. त्यात वैधानिक इशारा नसलेले तीन लाख 61 हजार 570 रुपयांचा सिगारेटचा साठा जप्त केला. तसेच पुन्हा गाेदामाचा वापर होऊ नये यासाठी सील करण्यात आले. त्यानंतर यासंदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित सोनू लोहिया, रामविलास लोहिया, मनोज लोहिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

तसेच अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांनी नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गावातील लाेहिया कम्पाउंडमधील झेन मार्केटिंगच्या दाेन गोदामांत गुटखा असल्याच्या संशयावरून धाड टाकली. पोलीस बंदोबस्तात दोन्ही गोदामे उघडली असता, दीड लाख रुपयांचा वाह पान मसाला, 18 हजार 750 रुपयांचे डब्ल्यू सुगंधी तंबाखू, नऊ लाख 21 हजारांचा राजनिवास पान मसाला, दोन लाख 40 हजारांची एक्सएल सुगंधी तंबाखू, एक लाख 26 हजारांचा हिरा पान मसाला, 15 हजारांची रॉयल 717 सुगंधी तंबाखू व चार हजार रुपयांची मिराज तंबाखू असा 14 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

याप्रकरणी गोदामाचे जागामालक व संशयित रामविलास लोहिया, मनोज लोहिया व पुरवठादार व उत्पादकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, गोपाळ कासार, संदीप देवरे, अमित रासकर, योगेश देशमुख यांनी सहआयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केली.

तीन दिवसांपासून धडक कारवाई 
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून शहर परिसरात जोरदार कारवाई सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक राेडमधील सुभाष राेडवरील सचदेव आर्केड या ठिकाणी असलेल्या गोदामावर छापा टाकला. त्यात वैधानिक इशारा नसलेले तीन लाख 61 हजार 670 रुपयांचा सिगारेटचा साठा जप्त केला. शिंदे गावातील लाेहिया कम्पाउंडमधील झेन मार्केटिंगच्या दाेन गोदामांत गुटखा असल्याच्या संशयावरून धाड टाकली. पोलीस बंदोबस्तात दोन्ही गोदामे उघडली असता या गोदामातून एकूण 14 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *