Nashik Drone Bann : सावधान! ड्रोन वापरताय, नाशिक पोलिसांनी घेतला महत्वाचा निर्णय, असा आहे पोलिसांचा आदेश

Nashik Drone Bann :  नाशिकमध्ये (Nashik) लष्करी हद्दीत एक महिन्यात दोनवेळा ड्रोन (Drone) उडाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून संरक्षण विभागासह गृह विभागाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आता ड्रोन उडवण्यावर बंदी घातली आहे, नाशिक पोलिसांनी सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नाशिक शहरात लष्करी हद्दीत (Army aviation) ड्रोनने रेकी करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgaon Police Station) हद्दीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) परिसरात ड्रोन उडवण्यात आला आहे. नाशिकच्या लष्करी हद्दीत हा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने खळबळ उडाली होती. तर त्याआधी गांधीनगर परिसरातील आर्टीलरी सेंटर (Artilary Center) परिसरात ड्रोन उडवल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर सरंक्षण विभाग, पोलिस, इंटेलिजन्स टिम आणि अँटी टेररिझम ब्रँच कडून तपास सुरू करण्यात आला आहे. अनेकदा दहशतवादी किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीकडून ड्रोनद्वारे नुकसान केले जाते. किंवा देशातील महत्वाच्या ठिकाणाची ड्रोनद्वारे रेकी केली जाऊ शकते. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक शहरात ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. 

नाशिक पोलिसांनी शहराच्या आणि राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा मोठ्या मोठ्या कार्यक्रमात ड्रोनचा वापर केला जातो. मात्र काही वेळा याच माध्यमातून दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता बळावते. म्हणून ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील 16 संवेदनशील ठिकाणे ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. म्हणून ड्रोन वापरण्यासाठी आधी नाशिक पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या सहीनिशी प्रसिद्धी केले आहे. 

काय आहे आदेश?
नाशिकमधील महत्त्वाची धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, लष्करी आस्थापने, प्रतिबंधित क्षेत्र ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित करण्यात आले आहेत. शहरातील निश्चित केलेल्या ठिकाणी विनापरवानगी ड्रोन कॅमेरा वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय शहरातील सर्वानीच आपले ड्रोन कॅमेरे संबंधित पोलिसांकडे जमा करण्यात यावे. ज्यावेळी आपल्याला ड्रोनची आवश्यकता असेल त्यावेळी परवानगी घेऊन ड्रोन पोलीस कार्यालयातून घेऊन जावा. मात्र ड्रोनने शूट करण्यापूर्वी आपल्यासोबत पोलीस कर्मचारी असणार आहे. शूट झाल्यावर पुन्हा ड्रोन कॅमेरा पोलीस ठाण्यात जमा करावा, असे वाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

‘ही’ ठिकाणे ‘नो ड्रोन फ्लाय झोन’
नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत स्कूल ऑफ आर्टिलरी, इंडिया प्रेस, करन्सी नोट प्रेस, एकलहरा थर्मल पॉवर स्टेशन, शासकीय मुद्रणालय, श्री काळाराम मंदिर, एअर फोर्स स्टेशन, आर्मी स्कूल, मध्यवर्ती कारागृह, पोलीस प्रशिक्षण केंद्र एअरफोर्स स्टेशन बोरगड, म्हसरूळ व देवळाली कॅम्प,  कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल गांधीनगर, मध्यवर्ती कारागृह जेलरोड, नाशिक रोड व किशोर सुधारालय सीबीएस जवळ, नाशिक महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी व गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय एमपीए परिसर त्र्यंबक रोड, आकाशवाणी केंद्र गंगापूर रोड, पोलीस मुख्यालय व पोलिस आयुक्त कार्यालय गंगापूर रोड, जिल्हा व सत्र न्यायालय सीबीएस, जिल्हा शासकीय रुग्णालय त्र्यंबकरोड, रेल्वे स्टेशन नाशिक रोड व देवळाली कॅम्प, मनपा जलशुद्धीकरण केंद्र ही संवेदनशील ठिकाणे घोषित करण्यात आले असून या ठिकाणी दोन उडवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *