Palghar Stray Dogs : पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत; तीन महिन्यात 6122 जणांना घेतला चावा, नागरीक भीतीच्या छायेत

पालघर :  राज्यभरात भटक्या कुत्र्यांची  (Strays Dogs) दहशत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती पालघर जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहर त्याचप्रमाणे नगरपालिका, नगरपरिषद हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागात ही भटक्या कुत्र्यांच्या झुंडच्या झुंड फिरत असताना पाहायला मिळत आहेत. मात्र, याकडे कुणीही गंभीरपणे पाहात नाही. पालघर जिल्ह्यात तीन महिन्यात 6122 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

श्वान दंश झालेल्या अशा घटना महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी घडल्या आहेत. सध्या श्वानांची नसबंदी हा तर फार्सच ठरत असल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे, हतबल नागरिक आणि प्राणिप्रेमी यांच्यातही संघर्ष होताना दिसतोय. प्रसंगी कुत्र्यांना निष्ठुरपणे मारले जाते. ही सगळी समस्या समन्वित दृष्टीने हाताळण्याची जबाबदारी राज्य सरकारची व महापालिका, नगर परिषदा यांच्याकडे आहे. परंतु ह्या बाबीकडे ह्या यंत्रणांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पालघर जिल्ह्यात याच भटक्या कुत्र्यांमुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्हयात शासकीय रुग्णालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार तब्बल  6122 जणांना श्वान दंश झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. तर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा मोठी असल्याचं सांगण्यात येतंय. या संख्येमध्ये पालघर तालुक्यात सर्वात जास्त लोकांना कुत्र्याने चावा घेतला असून त्याची तीन महिन्याची आकडेवारी तब्बल 2092 अशी आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 3182 ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 2940 इतकी आहे.

तालुका.   ग्रा. रु. संख्या.  पी एच सी संख्या.     एकूण

डहाणू         565.                    485          1050
पालघर     1067.                   1025         2092
जव्हार         152.                   105         257
विक्रमगड     192                   101         293
तलासरी        113                  139         252
वसई विरार    590                  952         1542
वाडा            216                   284         500
मोखाडा           45                  91           136
————————————————
                   2940               3182        6122

पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये यावर पुरेसा लस साठा उपलब्ध  असून रुग्ण दाखल झाल्या झाल्या त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात येतात. अशा रुग्णांनी खाजगी रुग्णालयात जाण्यापेक्षा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार होतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांनी दिली. 

 रेबिजमुळे जीव गमावण्याचा धोका 

प्राणी चावल्यामुळे पसरणारा रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे. योग्यवेळी निदान आणि वैद्यकीय उपचार मिळाले नाही तर रुग्ण दगावू शकतो. हा विषाणू मज्जासंस्थेवर घाव घालतो. त्यामुळे रुग्णाच्या मणक्यात सूज येते. शरीराची कार्यक्षमता कमी होत जाते. काही रुग्णांना पक्षाघाताचा झटकाही येतो. रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेमधून हा आजार फैलावतो. योग्यवेळी वैद्यकीय उपचार न केल्यास तो जिवावर बेततो. पॅरेलॅटिक रेबीजमध्ये स्नायूंची क्षमता कमी होते. तर काही रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येतो. पूर्वी या आजाराबाबत अनेक गैरसमज होते. जनजागृतीमुळे ते कमी झाले आहेत. 

रेबिज प्रतिबंधासाठी लशीच्या पाच मात्रा घ्याव्या लागतात. ज्या दिवशी कुत्रा चावतो त्याच दिवशी लस घ्यावी लागते. त्याला शून्य दिवस समजून त्यानंतर तिसऱ्या, सातव्या, चौदाव्या व अठ्ठाविसाव्या दिवशी लस घेतली जाते. ज्या प्राण्यांना रेबिजविरोधी लस दिली आहे ते चावले तरीही रेबिजची लस दिली जाते. जखम किती खोल व गंभीर आहे, हे तपासल्यानंतर उपचाराची दिशा निश्चित होते. काही वेळा लशीसोबत रेबीज इम्युनोग्लोबिन द्यावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *