Sudhir Mungantiwar : टीका करताना मर्यादीत आणि तर्कसंगत टीका करा, सुधीर मुनगंटीवारांचा गोपीचंद पडळकरांना सल्ला

वर्धा : एका राजकीय नेत्याने दुसर्‍या राजकीय पक्षावर टीका करत असताना संयमीत, मर्यादीत आणि तर्कसंगत टीका केली पाहिजे असं वक्तव्य राज्याचे मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं आहे. आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं आहे. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, टीकेचा स्तर घसरत आहेत. राजकारणात या अगोदर ही पद्धत कधीच नव्हती. पण, काही वर्षांपासून आपण बघितलं चंद्रकांत दादांबद्दलच भाष्य करताना, देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत भाष्य करताना जो निम्न स्तर काही लोकांनी, काही राजकीय नेत्यांनी किंवा त्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी गाठला आहे तो दुर्देवी आहे. देवेंद्र फडणवीस या राज्यातले अतिशय सज्जन नेते आहेत जे राजकारणात मुद्यांच्या आधारावर राजकारण व्हावं, या भावनेने काम करतात. मला वाटत की कुणीही दुसर्‍या नेत्यावर टीका करताना स्तर घसरू नये याची काळजी घ्यावी. 

22 जागा लढवणार हे माईकवरून सांगायची गरज नव्हती

शिंदे गटाने लोकसभेच्या 22 जागांवर दावा केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शिंदे गटाला 22 जागा लढायच्या आहेत हे माईकवरून सांगायची आवश्यकता नव्हती. जेव्हा सर्वपक्षीय म्हणजेच आमच्या तीन पक्षाची बैठक एकत्र होईल तेव्हा आपले मत व्यक्त करायचं होतं. कोणत्या जागा, किती लढायच्या हे त्या त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते, त्या ठिकाणी असणारे सर्व्हे, त्या ठिकाणी असणारी शक्ती आहे त्या आधारावर ठरते. आकड्यांच्या आधारावर युती थोडी होते. युती तर एकमेकांच्या सहकार्याने, त्या ठिकाणचे आकलन, मूल्यांकन करून होत असते. त्यांनी सहज आपली इच्छा व्यक्त असेल.

मोदींना जगाचा कप्तान करायचं आहे

आमच्यामध्ये एक सूर, एक विचार आहे.आम्ही सर्व जण विश्वगौरव देशनायक, युगपुरूष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात हा देश जगाचा कप्तान व्हावा यासाठी काम करतोय. वसुधैव कुटुंबकम हा जो आमचा भाव आहे, या भावनेने जगामध्ये आमच्या देशाचा गौरव वाढावा, आपल्या देशातील गरीबातील गरीब माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, त्याच्या आयुष्यातील गरिबीचा अंधार दूर व्हावा, या दृष्टीने विश्वगौरव नरेंद्र मोदी काम करत आहेत. किती लोकसभा लढवायचं अन् कोण खासदार होईल, कोण आमदार होईल, यासाठी आपण कधीच काम केलं नाही. 

ही बातमी वाचा: 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *