Washim News :वाशिममध्ये वीज पडल्याच्या एका दिवसात तीन घटना, एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी

वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यामध्ये गुरुवार (21 सप्टेंबर) रोजी विजांच्या  कडकडाटासह पावसाने (Rain) हजेरी लावली. यामुळे तीन ठिकाणी वीज पडल्याची घटना घडल्या आहेत. यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पाच जनावरे देखील दगावली आहेत. वाशिममधील अनसिंग येथील शेतामध्ये काम करण्यासाठी ही महिली गेली होती. नफीसापरविन शेख रफिक 28 वर्षे या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. तर  मनताज बी शे सत्तार 35 वर्ष ही महिला गंभीर जखमी झाली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी  25  महिला शेतात  निंदन करत होत्या. 

तर वाशिममधील रिसोडमधील तालुक्यातील नेतन्सा या गावामध्ये वीज पडल्याने दोन जनावरे दगावली आहेत. रिसोड तालुक्यातील नेतन्सा येथील शेतकरी तुकाराम  बाजड यांच्या शेतात झाडाखाली एक गाय आणि म्हैस बांधून ठेवली होती. त्याचवेळी वीज पडल्याची घटना घडली. यामध्ये ही दोन्ही जनावरं दगावली. तर मानोरा तालुक्यातील रुई  गोस्ता शेतशिवरात अंगावर वीज पडल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनील जंगम या शेतकऱ्याची ही बैल जोडी होती. त्यांना पाऊस पडत असल्याने शेतात झाडाखाली बांधून ठेवलं होतं. त्याचवेळी वीज कोसळली. त्यामध्ये या दोन बैलांचा मृत्यू झाला. यामुळे या शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. 

बरेच दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी वर्ग सुखावल्याचं पाहायला मिळत आहे. पण वाशिममधील वीज पडल्याच्या घटनांमुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. तसेच राज्यात सध्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत चालल्याचं चित्र आहे. यामुळे डबघाईला आलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळतयं. 

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा 

पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. तर पुढील तीन दिवस  म्हणजे 23 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Maharashtra Rain : पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता, ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *