चोरी उघडकीस येऊ नये म्हणून कामगारांनीच लावली आग!
उरण येथील सामवेदा लॉजिस्टीक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला ८ जानेवारी रोजी आग लागली होती. आगीत गोदामातील कोट्यवधी रुपयांचा माल खाक झाला होता. या आगीप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
कंपनीतील कामगारांनी गोदामातील माल चोरीचा प्रकार उघडकीस येऊ नये, म्हणून गोदामाला आग लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी रविवारी सात आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांचा मोठा खुलासा: आगप्रकरणी ७ जणांना अटक, रोमेश सूर्यकांत भुवड, सिद्धेश विजय रहाटे, किरण दशरथ पंडित, दिगंबर अनंता वानखेडे, संजय शंकर घाग, सचिन चंद्रकांत कदम, पांडुरंग लक्ष्मण शेरेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे, स.पो. नि. गणेश शिंदे, अनिरुद्ध गिजे, शिवाजी हुलगे, उपनिरीक्षक चंद्रहार पाटील, सुशांत दुड्डे यांनी या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने तपास करून आरोपींना अटक केली आहे.
आग लागण्याच्या एक दिवस अगोदर गोदामात ठेवलेल्या ५० किलो वजनाच्या १८०० सुपारीच्या गोणींमधून ५०० सुपारीच्या गोणींची चोरी केली होती. चोरी केलेल्या सुपारीची किंमत बाजारभावाप्रमाणे १ कोटी ९७ लाख ८२ हजार ५०० रुपये इतकी होती. ही चोरी गोदाम मालक आणि कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्षात येऊ नये म्हणून गोदामातील मालाला आग लावली होती. या आगीमध्ये १७ कोटी ५६ लाख रुपयांचा माल जळून खाक झाला होता. या आगीबाबत सुरुवातीपासूनच संशयाचा धूर येत होता. पोलिसांनी गोदामासमोर असलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आगीच्या वेळेस गोदामातील सुरक्षारक्षक आणि कामगार संशयितरीत्या हालचाल करत असल्याचे दिसून आले होते.