ट्रक चालकांच्या आंदोलनाला लागले हिसंक वळण – नवीन मोटार वाहन

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातात मदत केली नाही तर 10 लाखांचा दंड आणि 7 वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून जेएनपीटी मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरु केले. नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात नवी मुंबई ते जेएनपीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांचे आंदोलन सुरु होते. सकाळी साडे अकरा-बारापर्यंत सदर आंदोलन सुरळीत सुरु होते. मात्र त्यानंतर पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्याला विरोध करणार्‍या पोलिसांवर ट्रक चालकांनी हल्ला चढवला. आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करीत मागे हटवले तसेच दगडफेक आणि काठ्यांनी मारहाण केली. पोलिसांनी रस्त्यावरील ट्रक बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. मात्र दुपारी साडे बारा नंतर काही उत्साही ट्रक चालकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी अटकाव करत असताना, समजूत काढत असताना काही ट्रक चालकांनी सामान्य गाड्यांना लक्ष करीत काठ्यांनी हल्ला केला.
सकाळच्या प्रहरात आंदोलन शांततेत सुरु झाले. मात्र दुपारी साडे बारा नंतर काही उत्साही ट्रक चालकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. एवढ्यावरच हे थांबले नाहीत, तर रस्त्यावर दगड टाकण्यात आले. पोलिसांवर दगडफेक केली गेली आणि काठ्यांनी काही पोलिसांना मारहाण केली गेली. पोलिसांनी अधिक कुमक मागवली आणि लाठीचार्ज करीत 50 पेक्षा अधिक ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती एनआरआय पोलिसांनी दिली. मात्र अद्याप वातावरण तणावपूर्ण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *